यवत : यवत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पैशाची मागणी केल्याच्या आरोपावरून यवत पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी दिला आहे. यवत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अमोल दिलीप खैरे असे या निलंबन केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अमोल खैरे याने यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिसींग केस दाखल करण्यासाठी व शोध घेण्यासाठी तक्रारदार जितेंद्रकुमार सुजाराम चौधरी, (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांच्याकडून दहा हजार रुपये रक्कम मागितली व ती स्वीकारली होती. सदर प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी वरीष्ठांनी पोलीस हवालदार अमोल खैरे यांना बोलावले असता त्यांनी टाळाटाळ केली.
दरम्यान, त्या अनुषंगाने सदर प्रकरणात खैरे याने दाखवलेल्या संशयीत, हेकेखोर, विपर्यस्त वर्तनाबद्दल त्यांच्या विरूध्द शिस्त भंगविषयक कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी काढला. त्यानुसार पोलीस हवालदार अमोल खैरे यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन आदेश निर्गमित केलेचे दिनांकापासुन “शासकिय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदांरावर प्रभाव टाकण्याची दाट शक्यता असल्याने, आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीसाठी त्यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय हे पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे राहील आणि त्यांना निम्न स्वाक्षरीत व्यक्तिच्या पुर्वपरवानगीशिवाय पोलीस मुख्यालय सोडता येणार नाही. खैरे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे, व्यापार किंवा धंदा करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वोकारल्यास किंवा धंदा केल्यास तो गैरवर्तणुकीबद्दल दोषी ठरेल आणि त्यानुसार कार्यवाहीस पात्र ठरेल. तसेच, अशा बाबतीत तो निर्वाह भत्त्यावरील आपला हक्क गमावून बसेल.
दरम्यान, दरमहा निर्वाह भत्ता घेताना वरील नियमानुसार राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय यांना निलंबन कालावधीमध्ये त्या महिन्यात कोणतीही खाजगी नोकरी अथवा धंदा स्वीकारून अर्थार्जन केले नाही, याबाबतचे लेखी प्रमाणपत्र देवून निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी. तसेच सकाळ व संध्याकाळ या प्रमाणे दिवसातुन दोनवेळी हजेरी देणे बंधनकारक राहील. असे ही या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, तक्रारदार आणि आरोपींकडून पैसे उकळणे हा प्रकार पोलीस ठाण्यात काय नवीन नाही मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख यांनी केलेल्या या कारवाई मुळे लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



