आवाज लोकशाहीचा.. भिगवण..प्रतिनिधी
…या६० सभासदांचा बचत गट; सहा वर्षांत सुमारे चार कोटींची बचत होण्याचा अंदाज…
अखिल भारतीय मराठा महासंघ, शाखा भिगवण यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या छत्रपती पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी कर सल्लागार श्री. गणेश बागल, तर सचिवपदी श्री. प्रदीप नांदगुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय, भिगवण येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
छत्रपती पुरुष बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी आणि अडीच कोटी रुपयांचे दोन बचत गट यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. यंदा नव्याने स्थापन करण्यात आलेल्या बचत गटात एकूण ६० सभासदांचा समावेश असून प्रत्येक सभासदाकडून दरमहा ५ हजार रुपये बचत जमा करण्यात येणार आहे. ही बचत सहा वर्षांच्या कालावधीत जमा करून त्यातून सभासदांना अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सदर बचत गटाची मासिक बचत आणि कालावधी लक्षात घेता, सहा वर्षांच्या कालावधीत बचत गटाचा निधी साधारणपणे चार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
नवनियुक्त अध्यक्ष गणेश बागल म्हणाले, “सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरवत बचत गटाचे कामकाज पारदर्शक पद्धतीने आणि सर्व सभासदांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.”
नवनियुक्त सचिव प्रदीप नांदगुडे यांनी बचत गटाची नियमावली, सभासदांना मिळणारे फायदे आणि कर्जवाटपाबाबत सविस्तर माहिती दिली. या बचत गटातून सभासदांना अर्धा टक्का व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद असून, नियमानुसार प्रत्येक सभासदाला साधारणपणे पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजकुमार मस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, तालुकाध्यक्ष छगन वाळके, शाखाध्यक्ष डॉ. संकेत मोरे, तसेच विकास वाघ, राजेंद्र वाघ, अभिनव वाघ, प्रमोद धुमाळ, नामदेव जगताप, भरत ननवरे, प्रशांत ढवळे, अर्जुन मिंडे, किरण लंगोटे आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी किरण लंगोटे यांनी बचत गटाचा पहिला हप्ता अध्यक्ष व सचिवांकडे जमा करून नव्या बचत गटाच्या कार्याला सुरुवात केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. पांडुरंग जगताप यांनी केले. राजकुमार मस्कर व डॉ. संकेत मोरे यांनी मार्गदर्शन केले, तर आभार प्रदर्शन छगन वाळके यांनी केले.



