आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण | विशेष वृत्त
दौंड : सोशल मीडियावर महिलेच्या नावाचा व छायाचित्रांचा कथित गैरवापर करून बनावट इन्स्टाग्राम खाती तयार केल्याच्या गंभीर प्रकारात दौंड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित महिलेने तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठल्यानंतरही तब्बल १२ तास अधिक प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप समोर येत आहे. अखेर इतका वेळ ताटकळत ठेवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मग नागरिकांना न्याय देण्यासाठी असलेल्या पोलीस यंत्रणेकडून तक्रार नोंदविण्यासाठी एवढा विलंब का?असा प्रश्न उपस्थित झाला आहे ,
महिलेच्या वैयक्तिक ओळखीचा, छायाचित्रांचा आणि सोशल मीडिया खात्यांचा गैरवापर झाल्याची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. अशा प्रकारामुळे संबंधित महिलेची सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक शांतता आणि वैयक्तिक आयुष्य प्रभावित होऊ शकते. अशा संवेदनशील प्रकरणात तक्रारदाराला तातडीने मदत आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असताना तब्बल १२ तास अधिक प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप पोलिसांच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्न निर्माण करणारा आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ७८(२), ७९, ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(सी), ६६(डी) आणि ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये एका संशयिताचे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
कायदा नागरिकांसाठी आहे की नागरिकांनी कायद्याच्या दारात ताटकळत राहायचे?
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १७३ नुसार दखलपात्र गुन्ह्याची माहिती नोंदविण्याबाबत तरतुदी आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती मिळाल्यास त्यावरही कायद्यातील निर्धारित प्रक्रिया लागू होते. त्यामुळे तक्रार नोंदविण्यास विलंब झाला असल्यास त्यामागील नेमके कारण काय, याची स्पष्टता पोलीस प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
विशेषतः महिला सुरक्षेच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत पोलीस यंत्रणेने तत्परता दाखविणे ही केवळ अपेक्षा नसून कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीशी संबंधित बाब आहे.
आता प्रश्न उपस्थित होऊ शकतात
संबंधित महिलेला पोलीस ठाण्यात तब्बल १२ तास का थांबावे लागले?
तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया का सुरू करण्यात आली नाही?
गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे अधिकृत कारण काय?
या विलंबाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का?
भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यादौंड पोलीस ठाण्यातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हसाठी पोलीस प्रशासन कोणती कार्यवाही करणार?
गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपली असे होत नाही. तक्रारदाराला वेळेत न्याय मिळणे, पुरावे सुरक्षित ठेवणे आणि निष्पक्ष तपास करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.
आता या प्रकरणात दौंड पोलीस प्रशासन १२ तासांच्या अधिक विलंबाबाबत काय स्पष्टीकरण देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या बाबत पोलिस अधिकारी हेमंत शेडगे यांना माहिती विचारली असता हा गुन्हा सायबर सुरक्षा बाबत असल्याने सबंधित विभागाकडून याची पडताळणीं करावी लागते त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाते अशी माहिती दिली आहे .



