दिवाळीच्या सुट्टीत ज्ञानाचा जागर; ४६ शाळांमध्ये ‘दिवाळी ज्ञानदीप अभियान २०२६’!
आवाज लोकशाहीचा | विशेष वृत्त विजय चव्हाण
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचा सण! मात्र याच सुट्टीत विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला नवी दिशा, कल्पनाशक्तीला भरारी आणि अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या विधायक दृष्टिकोनातून पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य श्री. सागर रघुनाथ शेलार यांच्या संकल्पनेतून ‘दिवाळी ज्ञानदीप अभियान २०२६’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
‘कृतीतून शिक्षण… आनंददायी शिक्षण!’ हे प्रेरणादायी ब्रीदवाक्य घेऊन राबविण्यात येणाऱ्या या अभियानामुळे दिवाळीची सुट्टी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, अनुभव आणि सर्जनशीलतेची पर्वणी ठरणार आहे.
या उपक्रमांतर्गत राहू-खामगाव जिल्हा परिषद गटातील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृतीपुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे अनावरण पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील, समाजकल्याण सभापती श्री. जितेंद्र बडेकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. अमोल नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती ललिता दहितुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भूषण जोशी, आदर्श शिक्षक श्री. दत्तात्रय वारे, उद्योजक श्री. सोमनाथ शेलार आणि सतीश महाराज टिळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
४६ शाळांपर्यंत पोहोचणार ज्ञानाची ज्योत!
या अभियानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहू-खामगाव जिल्हा परिषद गटातील तब्बल ४६ जिल्हा परिषद शाळांना या कृतीपुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अधिक सक्रिय सहभागी करून घेण्याबरोबरच त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत आनंद आणि अनुभवांची जोड देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
या कृतीपुस्तिकेमध्ये वाचन, लेखन, गणित, विज्ञान प्रयोग, कला, निसर्गसंवर्धन, आरोग्य, ‘माझे गाव माझा अभिमान’, संवाद आणि जीवनकौशल्य अशा विविध विषयांवर आधारित उपयुक्त कृतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष निरीक्षण, प्रयोग आणि अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शिक्षणासोबत संस्कार, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीव!
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, हा या अभियानाचा व्यापक उद्देश आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात शिक्षकांसोबतच पालकांचाही सहभाग अपेक्षित असल्याने घर आणि शाळा यांच्यातील शैक्षणिक नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी श्री. सागर शेलार यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, जिज्ञासा वाढावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने ‘दिवाळी ज्ञानदीप अभियान’ संकल्पना साकारण्यात आली आहे. राहू-खामगाव गटातील ४६ शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आनंददायी आणि कृतीयुक्त शिक्षण पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
दिवाळीच्या दिव्यांबरोबरच ज्ञानाचेही दीप उजळणार!
शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेतील गुणांची बेरीज नसून विचार करण्याची क्षमता, अनुभवातून शिकण्याची वृत्ती आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी निर्माण करणे होय. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारा ‘दिवाळी ज्ञानदीप अभियान २०२६’ हा उपक्रम ग्रामीण शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक पाऊल ठरण्याची अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या हातात केवळ फटाके नव्हे, तर ज्ञान, कल्पकता आणि नव्या संधींची मशाल देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या आनंदयात्रेला नवी दिशा देणारा ठरू शकतो.




