संघर्षातून समाजसेवेचा प्रवास; शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा अन् सामाजिक कार्याचा ठसा!महेंद्र गोसावी यांची ३५ वर्षांची वाटचाल ठरतेय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी


संघर्षातून समाजसेवेचा प्रवास; शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा अन् सामाजिक कार्याचा ठसा!
महेंद्र गोसावी यांची ३५ वर्षांची वाटचाल ठरतेय नव्या पिढीसाठी प्रेरणादायी; राजकारण, समाजकारण आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण योगदान
आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड : राजकारण म्हणजे केवळ पद, प्रतिष्ठा आणि सत्तेची गणिते नसतात, तर सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे म्हणजे खरे समाजकारण! या विचाराला आपल्या तब्बल ३५ वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीतून अधोरेखित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनेचे दौंड तालुका उपप्रमुख महेंद्र गोसावी.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मनाशी जपत गोसावी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. केडगाव उपशहरप्रमुख या पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
राजकीय वाटचालीसोबतच संघटनात्मक बांधणीवर त्यांनी विशेष भर दिला. केडगाव परिसरात शिवसेनेची दोन प्रशस्त कार्यालये उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्षसंघटनेला बळ देतानाच रक्तदान शिबिरे, सायकल स्पर्धा, मोफत देवदर्शन यात्रा अशा विविध सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त चौफुला येथे ७५ वृक्षारोपणाचा उपक्रम तसेच भव्य मंगल कार्यालयात ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
रिक्षाचालक ते संघटनात्मक नेतृत्व!
महेंद्र गोसावी यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी स्वतः केडगाव-चौफुला मार्गावर सुमारे दहा वर्षे रिक्षा चालवली. त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालकांच्या अडचणी आणि व्यावसायिक प्रश्नांची त्यांना जवळून जाणीव आहे. रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सहकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. अडचणीच्या प्रसंगी नागरिकांना मदतीचा हात देत सहकाऱ्यांना एकत्र आणण्याचे कामही त्यांनी केले.
दक्षिणमुखी मारुती मंदिरात श्रावणी पूजेची परंपरा सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
समाजकारणातही विविध जबाबदाऱ्या!
शिवओशिया दशनाम गोसावी समाज संस्थेच्या माध्यमातून त्यांनी दौंड तालुकाध्यक्ष आणि त्यानंतर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अशी जबाबदारी सांभाळली. तसेच सकल दशनाम गोसावी समाज संस्था, पुणे जिल्हा येथे खजिनदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
समाजाची लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि भविष्यातील विकासाच्या संधी यांचा अभ्यास करून समाजाच्या भल्यासाठी भरीव योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
३५ वर्षांची वाटचाल, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी!
राजकीय निष्ठा, व्यावसायिक संघर्ष, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक जबाबदारी या सर्वांचा समतोल साधत महेंद्र गोसावी यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पदापेक्षा माणसांशी जोडलेले नाते महत्त्वाचे मानणाऱ्या त्यांच्या कार्याचा प्रवास दौंड तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
समाजासाठी वेळ देणे, सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि संघटनेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे, ही त्यांच्या वाटचालीची ठळक वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.
आवाज लोकशाहीचा विशेष : राजकारणात अनेकजण पदासाठी धडपडतात; मात्र सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारे कार्यकर्तेच समाजाच्या स्मरणात राहतात. महेंद्र गोसावी यांच्या ३५ वर्षांच्या प्रवासाकडे याच दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.