आवाज लोकशाहीचा
विशेष प्रतिनिधी : विजय चव्हाण
कोट्यवधींच्या शासकीय इमारती वापराविना; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!
दौंड तालुक्यात शासकीय कामांच्या उद्घाटनाचा विषय सध्या चर्चेचा ठरत आहे. अर्धवट अवस्थेतील क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन प्रांताधिकारी कार्यालय आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दौंड शहरात शासनाच्या निधीतून दोन महत्त्वाच्या प्रशासकीय इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या बांधकामाची कामे अंतिम टप्प्यात असून रंगरंगोटीही पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र, कार्यालयीन फर्निचर, अंतर्गत सुविधा आणि आवश्यक सोयीसुविधांची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या इमारती प्रत्यक्ष वापरासाठी कधी खुल्या होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे, शहरातील क्रीडांगणाचे काम पूर्ण झाले नसतानाही मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी दाखविण्यात आलेली तत्परता आता पूर्णत्वाकडे जाणाऱ्या शासकीय इमारतींच्या बाबतीत का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उद्घाटन समारंभापेक्षा कामाचे पूर्णत्व आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा महत्त्वाच्या नाहीत का, असा सवालही नागरिक विचारत आहेत.
सध्या दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव धडस यांच्या कार्यकाळात नवीन कार्यालयाचे उद्घाटन होणार की नाही, याबाबत तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सध्याचे डीवायएसपी कार्यालय मर्यादित जागेत असल्याने अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहनांच्या पार्किंगचाही प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत नवीन कार्यालय सुरू होणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.
मात्र, नवीन इमारतीत कोणत्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत कार्यालय सुरू होणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या पसंतीचा अधिकारी नवीन कार्यालयात रुजू झाल्यानंतरच उद्घाटन व्हावे, अशी काही राजकीय मंडळींची अपेक्षा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सध्याचे डीवायएसपी बापूराव धडस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होऊ नये, अशा प्रकारची भूमिका काही जण घेत असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत.
या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी कोणता असावा किंवा उद्घाटन कोणाच्या उपस्थितीत व्हावे, यापेक्षा शासकीय इमारतीचा प्रत्यक्ष वापर सुरू होणे महत्त्वाचे आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या हा शासनाचा प्रशासकीय अधिकार आहे. त्यामध्ये राजकीय प्रतिष्ठेचा विषय निर्माण होऊ नये, हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
जनतेच्या पैशातून उभारलेल्या इमारती जनतेच्या सेवेसाठी कधी?
शासकीय इमारती या कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक नसून त्या जनतेच्या करातून आणि शासनाच्या निधीतून उभारल्या जातात. त्यामुळे बांधकाम पूर्णत्व, निधीचा विनियोग, गुणवत्तेची तपासणी आणि आवश्यक सुविधांची पूर्तता याबाबत प्रशासनाने पारदर्शक भूमिका ठेवणे गरजेचे आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही इमारतींच्या उर्वरित कामांचा तपशील, काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत आणि उद्घाटनानंतर कार्यालयीन कामकाज सुरू करण्याचे नियोजन जाहीर करावे. तसेच कोणत्याही इमारतीचा वापर सुरू करण्यापूर्वी आवश्यक तांत्रिक तपासणी, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी.
दौंडला राजकारण नव्हे, सक्षम प्रशासन हवे!
दौंड तालुक्यात राजकीय मतभेद असू शकतात, विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात; मात्र विकासकामांच्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवणे आवश्यक आहे. समता, बंधुता, सामाजिक सलोखा आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित यांना प्राधान्य मिळाले पाहिजे.
एखादा अधिकारी जुना आहे की नवीन, तो कोणाच्या विचारांचा आहे, यापेक्षा त्याची प्रशासकीय कार्यक्षमता, कायद्याप्रती बांधिलकी आणि जनतेला मिळणारी सेवा महत्त्वाची आहे. शासकीय कामकाजात व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे अडथळे निर्माण होत असतील, तर त्याचा परिणाम शेवटी सर्वसामान्य नागरिकांवरच होतो.
आता दौंडकरांना केवळ उद्घाटनाचे फलक आणि समारंभ नकोत; तर प्रत्यक्ष सुरू होणारी कार्यालये, सक्षम प्रशासन आणि वेळेत पूर्ण होणारी विकासकामे हवी आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर द्यावे : क्रीडांगणाच्या उद्घाटनासाठी दाखविलेली तत्परता नवीन प्रांत कार्यालय आणि डीवायएसपी कार्यालयाच्या बाबतीत कधी दाखविणार? कारण जनतेच्या पैशातून उभारलेल्या इमारतींचा उपयोग जनतेलाच झाला पाहिजे, हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे!



