वाहनाच्या नुकसानभरपाईवरून वाद; महिलांसह कुटुंबावर कोयता-हॉकी स्टिकने हल्ला
दौंडमध्ये रुग्णालयाबाहेर थरार; दोघे गंभीर जखमी, खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा


आवाज लोकशाहीचा
दौंड : वाहनाच्या किरकोळ धडकेमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन, दौंड शहरातील खासगी रुग्णालयाबाहेर दोन महिलांसह कुटुंबीयांवर कोयता, हॉकी स्टिक व रॉडने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ११८(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १९१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक ६२२/२०२६ असून घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडल्याचे नोंदविण्यात आले आहे.
यश गायकवाड हे आपल्या आईच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये आले होते. हॉस्पिटलसमोर त्यांच्या कारला मोटारसायकलची धडक लागल्याने कारचे नुकसान झाले. याबाबत नुकसानभरपाईची मागणी केल्यानंतर दुचाकीस्वार कृष्णा भूल याने आपली चूक मान्य करून संबंधित मालकाला घटनास्थळी बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून वाद वाढला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अशपाक सय्यद याने नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्यानंतर वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यश गायकवाड यांच्या नातेवाईक मंथन यांना मारहाण करून त्यांचे डोके कारच्या बोनेटवर आपटल्याचा आरोप आहे. यश यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर आणखी काही जण घटनास्थळी आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यापैकी काहींच्या हातात कोयता, रॉड आणि हॉकी स्टिकसारखी हत्यारे होती, तर एका व्यक्तीकडे पिस्तूल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंथन यांना हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली, तर स्वानंद यांच्या डोक्यात कोयत्याचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
महिला नातेवाईकांनाही मारहाण
हल्ल्याच्या वेळी यश गायकवाड यांच्या आई आणि आजी यांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे. आईला धक्का दिल्याने त्या खाली पडल्या व त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आजी सोडविण्यासाठी पुढे आल्यानंतर त्यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एका इसमाने आईचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणात सज्जाद शौकत सय्यद, तबरेज शौकत सय्यद, झहीर नजीर सय्यद, अशपाक अन्सार सय्यद, कृष्णा भूपेंद्र भूल आणि अमोल ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये सहा आरोपींची नावे नमूद असून इतर चार ते पाच इसमांचाही उल्लेख आहे.
हल्ल्यात स्वानंद यांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली असून मंथन यांच्या हाताला व पाठीला दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोघांना पुढील उपचारासाठी खवटे हॉस्पिटल, दौंड येथे नेण्यात आल्याचेही एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गोकुळ गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, सहा संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.