आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दोन दिवसांची विश्रांती संपली; पहाटेच्या फेऱ्यांनी पुन्हा जोर धरला? प्रशासनाच्या आशीर्वादाच्या चर्चेने खळबळ
आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
यवत परिसरात काही दिवस थंडावलेला बेकायदेशीर गुटखा व पानमसाला विक्रीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे, काही दिवस बंद असलेली कथित विक्री आता पुन्हा पहाटेच्या वेळेत सुरू झाल्याची माहिती स्थानिक पातळीवरून समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही काळापूर्वी यवत परिसरातील गुटखा विक्रीबाबत आवाज लोकशाहीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस हा व्यवसाय आटोक्यात आल्याचे चित्र होते. मात्र आता पुन्हा चोरट्या पद्धतीने पुरवठा आणि विक्री सुरू झाल्याची चर्चा आहे.
‘हात ओले’ करून व्यवसाय? नागरिकांचा गंभीर आरोप
गुटखा विक्री करणाऱ्यांना प्रशासनातील काही व्यक्तींचे कथित संरक्षण असल्याची चर्चा यवत परिसरात पूर्वीपासूनच असल्याचे नागरिक सांगतात. महिन्याला ठराविक पद्धतीने ‘हात ओले’ केल्याशिवाय हा धंदा एवढ्या बिनधास्तपणे सुरू राहू शकतो का?, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे.
पहाटेची फेरी पुन्हा सुरू? गावोगावी माल पोहोचतोय!
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवस बंद पडलेली कथित ‘पहाटेची गुटखा फेरी’ पुन्हा सुरू झाली आहे. यवत परिसरातून आसपासच्या गावांतील वाड्या-वस्त्यांपर्यंत गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे.
यामुळे किरकोळ दुकानांपासून मोठ्या विक्रेत्यांपर्यंत हा माल सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. कायदा कागदावर आणि गुटखा दुकानात, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
यवतनंतर दौंड-पाटसकडेही पुरवठ्याची चर्चा
दौंड तालुक्यात यवत हा गुटखा विक्रीचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याची चर्चा असून, त्यानंतर दौंड व पाटस परिसरातही या अवैध व्यवसायाचा विस्तार झाल्याचे बोलले जात आहे.
दौंड शहरातही काही प्रमुख विक्रेत्यांकडून पूर्व भागातील गावांकडे मालाचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. कमी वेळेत मोठी उलाढाल आणि मोठ्या ग्राहकवर्गामुळे हा अवैध व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तरुणाईपासून महिलांपर्यंत व्यसनाचा विळखा
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे परिसरातील तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पुरुषांबरोबरच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे शासन व्यसनमुक्तीचा संदेश देते; दुसरीकडे गावोगावी गुटखा सहज उपलब्ध होतो—मग या विरोधाभासाला जबाबदार कोण?, असा थेट सवाल नागरिक करत आहेत.
कारवाई कोणावर आणि कधी?
यवत परिसरात पुन्हा गुटखा विक्री सुरू असल्याच्या चर्चेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन छापेमारी, माल जप्ती आणि पुरवठा साखळीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
यासोबतच प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीचा या व्यवसायाला कथित पाठिंबा असल्यास त्याचीही चौकशी व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
गुटखा विक्रेत्यांचा धंदा पुन्हा ‘फॉर्मात’ आला असेल, तर आता प्रशासनाचा ‘फॉर्म’ कधी दिसणार?
याचे उत्तर यवतकरांना मिळणार का, हा खरा सवाल आहे.



