यवत परिसरात गुटख्याचे थैमान!‘बंदी नावाला, गुटखा गावागावाला’; सकाळच्या फेऱ्यांतून खुलेआम पुरवठा?


आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
यवत परिसरात गुटखा विक्रीने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून, ‘गुटख्यावर बंदी फक्त कागदावर आणि विक्री मात्र गावागावात खुलेआम’ अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. खामगाव, नांदूर, मिरवडी, राहू बेट परिसरातील गावे, सहजपूर, बोरीभडक, भरतगाव, कासुर्डी, भांडगाव यांसह अनेक भागांतील छोट्या-मोठ्या दुकानांमधून गुटख्याची विक्री होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या विक्रीसाठी सकाळच्या प्रहरी दुचाकीवरून होणाऱ्या कथित फेऱ्यांमधून गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. काही व्यक्तींच्या नावांचा या कथित व्यवहाराशी संबंध असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असले, तरी या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

गुटखा विक्रीबाबत तक्रारी आणि बातम्या प्रसिद्ध होऊनही व्यवसाय सुरूच राहत असल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गुटखा विक्री करणाऱ्यांना कोणाचे संरक्षण आहे? या व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होते? महिन्याच्या हप्त्यांच्या चर्चेत तथ्य आहे का? याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘बातमी प्रसिद्ध झाली तरी काही फरक पडत नाही’, अशा प्रकारच्या कथित बढाया मारल्या जात असल्याचीही चर्चा परिसरात आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे की त्यामागे प्रत्यक्ष पुरावे आहेत, याचा तपास पोलिस प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

यवत परिसरात गुटख्याच्या कथित घाऊक व्यापारातून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत माल पोहोचत असल्याची चर्चा पूर्वीपासून आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नव्याने सक्रिय झालेल्या विक्री साखळीचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
गुटखा हा आरोग्यासाठी अत्यंत घातक असून, त्याच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. पॅकेटवर गंभीर आरोग्यविषयक इशारे असतानाही तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात जात असल्याने गुटखा विक्री रोखण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे.
पाटसपासून यवतपर्यंत ‘सप्लाय चेन’ची चर्चा
पाटस परिसरात गुटख्याचे कथित दोन प्रमुख केंद्र असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसेच, विक्रेत्यांमधील स्पर्धेतून एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी करून कारवाई घडवून आणण्याचे प्रकार होत असल्याचेही बोलले जाते. या आरोपांमध्ये तथ्य असल्यास संबंधितांची भूमिका आणि संपूर्ण व्यवहाराची साखळी तपासणे आवश्यक आहे.
गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी केवळ एखाद्या दुकानावर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. माल कुठून येतो, कोण पुरवतो, कोणत्या वाहनातून वाहतूक होते, घाऊक विक्रेते कोण आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तो कसा पोहोचतो, याचा तपास झाला तरच या अवैध व्यवसायाच्या मुळावर घाव घालता येईल.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्रीचे एवढे मोठे जाळे असल्याच्या तक्रारी होत असताना प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गुटखा बंदी कागदावरच राहणार की प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून कारवाई होणार?
हा प्रश्न यवत परिसरातील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत.