दौंड नगरपरिषदेला अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन, अग्निशामक वाहनांसह गुरखा वाहने व बुलेट मोटारसायकलींची भेट..

आवाज लोकशाहीचा विजय चव्हाण

दौंड नगरपरिषदेला अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन, अग्निशामक वाहनांसह गुरखा वाहने व बुलेट मोटारसायकलींची भेट
दौंड शहरातील स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दौंड नगरपरिषदेला मोठी मदत मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत नगरपरिषदेला सुमारे ४० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन आणि अग्निशामक वाहन उपलब्ध झाले असून, त्यांचे पूजन नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, उपनगराध्यक्षा छायाताई थोरात आणि आरोग्य सभापती कार्तिकी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन सक्शन-कम-जेटिंग मशीनच्या सहाय्याने शहरातील सांडपाणी वाहिन्या, गटारी आणि चेंबरमधील गाळ काढणे, जेटिंगद्वारे अडथळे दूर करणे तसेच मड पंपाच्या मदतीने प्रभावी सक्शन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्थेशी संबंधित तक्रारींचे जलद निराकरण होऊन शहरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुमारे ९० लाख रुपये किमतीची दोन गुरखा वाहने आणि दोन बुलेट मोटारसायकली देखील नगरपरिषदेला प्राप्त झाल्या आहेत. या वाहनांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद प्रतिसाद देणे, बचावकार्य प्रभावीपणे राबविणे आणि नागरिकांना तातडीच्या सेवा वेळेत उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
या कार्यक्रमास नागरी संरक्षण मंडळाचे गटनेते योगेशभैया कटारिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जिवराज बापू पवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, सर्व नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी सांगितले की, शहराची स्वच्छता, सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ही अत्याधुनिक वाहने महत्त्वाची ठरणार आहेत. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर नागरी सेवा देण्यासाठी दौंड नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच राज्यातील नगरपरिषदांना विविध योजनांद्वारे अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.