देऊळगाव-गाडा येथे दहा दिवसीय श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

आवाज लोकशाहीचा..

देवळगाव गाडा
देऊळगाव-गाडा (ता. दौंड, जि. पुणे) येथे बुद्ध धम्म ज्ञान प्रबोधिनी, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दहा दिवसीय निवासी श्रामणेर शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन दि. २० मे रोजी ग्रामपंचायत सदस्य संतोष विक्रम मोरे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच श्रामणेर प्रवज्जा भंते धम्मानंद (पुणे) यांच्या हस्ते देण्यात आली.
शिबिरामध्ये एकूण ४२ विविध विषयांवर सखोल अध्यापन करण्यात आले. यामध्ये विपश्यना, ध्यानधारणा, रोजची चारीका, सुत्तपठण, भगवान बुद्धांचे चरित्र, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, विविध सुत्तांवरील प्रवचने, बौद्ध संस्कार विधी, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती आदी विषयांचा समावेश होता. तसेच प्रवचन, व्याख्यान, भाषण आणि सूत्रसंचालन यांचेही प्रशिक्षण देण्यात आले.
दहा दिवसांच्या कालावधीत देऊळगाव-गाडा परिसर धार्मिक, मंगलमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता. प्रशिक्षणादरम्यान यवत, वरवंड, मळद, बोरिपारधी-चौफुला, बारामती व श्रीगोंदा येथे श्रामणेर संघाचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजी व फुलांच्या वर्षावात मोठ्या उत्साहात करण्यात आले.
बारामती येथील लेणी अभ्यासक प्रा. विकास शिंदे आणि गोविंद लोंढे गुरुजी यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पाली भाषा तसेच धम्मलिपी लिहिणे व वाचणे याचे प्रशिक्षण दिले.
दि. २९ मे २०२६ रोजी या शिबिराची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक व प्रमुख प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय प्रबोधनकार आद. श्रीकृष्ण मोरे गुरुजी यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामदास मोरे, राजेंद्र मोरे, नवनाथ साहेबराव मोरे, नवनाथ एकनाथ मोरे (अध्यक्ष, आर.पी.आय., देऊळगाव-गाडा ग्रामशाखा), तसेच स्थानिक सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था, सिद्धार्थ तरुण मंडळ आणि उपासक-उपासिका यांनी मोलाचे सहकार्य केले.