| प्रतिनिधी: विजय चव्हाण (आवाज लोकशाहीचा)
केडगाव: “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलीस दलाची प्रतिमा केडगाव परिसरात पुरती धुळीस मिळाली आहे. केडगाव पोलीस चौकीच्या नाकाखालीच अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, पोलिसांच्या आशीर्वादामुळे गुन्हेगारांचे ‘साम्राज्य’ फोफावले असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. कायद्याचे रक्षकच आता दोन नंबरच्या धंद्यांचे ‘अभयदाता’ बनल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
२०० मीटरमध्ये तीन अड्डे; ‘संसद ग्राम’मध्ये दारूचा महापूर!
प्रशासकीय दाव्यांची पोलखोल करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवघ्या २०० मीटर अंतरात तीन बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे आणि पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. ज्या भागाला ‘संसद ग्राम’ म्हणून ओळखले जाते, तिथेच हातभट्टीचे ५ ते ७ धंदे राजरोसपणे सुरू आहेत. खुटबाव रोड, २२ फाटा आणि पारगाव-नानगाव पट्ट्यात भेसळयुक्त दारूचा विषारी पुरवठा होत असून तरुणाई उद्ध्वस्त होत आहे.
हॉटेलच्या आडून देहविक्रीचा व्यापार?
पारगाव चौफुला रोडवरील एका नामांकित व्यक्तीच्या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वाकड (पुणे) येथील एका हॉटेल व्यावसायिकाची साखळी या धंद्याशी जोडली गेली आहे. “वरपर्यंत हात” असल्याने आणि पोलिसांना नियमित ‘रसद’ मिळत असल्याने या अड्ड्यांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गांजा विक्री आणि ‘अर्थपूर्ण’ अज्ञान?
चौफुला आणि पिसेवाडी परिसरात गेल्या काही वर्षांपासून गांजाची विक्री खुलेआम सुरू आहे. मंदिर परिसर आणि झाडाझुडपांच्या आडोशाला तरुण पिढी नशेत बुडालेली दिसते. पोलिसांना हे दिसत नाही की अर्थपूर्ण संबंधांमुळे ते ‘अज्ञानाचे सोंग’ घेत आहेत? असा जळजळीत सवाल विचारला जात आहे.
महामार्गावर चोरीचा सुळसुळाट
महामार्गावर लोखंड, सिमेंट आणि डिझेल चोरीच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना दाद मिळत नाही. “माया मिळते म्हणून डोळेझाक” करण्याची पोलिसांची वृत्ती सर्वसामान्यांच्या मुळावर उठली आहे.
दापोडी टोलनाका परिसरात अवैध धंद्यांकडून मोठ्या प्रमाणावर हप्ते गोळा केले जात असल्याची चर्चा आहे. पोलीस चौकीच्या परिसरातच दलालांचा वावर वाढला असून, तक्रारदाराची माहिती गुन्हेगारांपर्यंत पोहोचवून त्यांच्यावर दबाव टाकला जातो. “तक्रार आली की दोन्ही बाजूंनी ‘मिळकत’ पाहणारे” पोलीस आता जनतेचे सेवक उरले आहेत का?
यात्रेच्या नावाखाली ‘नैवेद्य’चा धिंगाणा
सध्या सुरू असलेल्या यात्रेमध्ये ‘नैवेद्य’च्या नावाखाली दारूची बेसुमार विक्री होत आहे. धार्मिक उत्सवाचा आधार घेऊन अवैध धंदेवाले गबर होत आहेत आणि पोलीस प्रशासन केवळ मूकदर्शक बनून हा तमाशा पाहत आहे.
रोखठोक मागणी: बदली करा, अन्यथा जनआक्रोश!
काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित पोलिसांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
आवाज लोकशाहीचा इशारा: जर केडगाव पोलिसांनी आपली कार्यपद्धती सुधारली नाही आणि अवैध धंदे मोडीत काढले नाहीत, तर नागरिकांचा हा संताप लवकरच आंदोलनाच्या ठिणगीतून रस्त्यावर उतरेल!



