आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी
चौफुला क्रॉसिंगवरील धोकादायक स्थिती पुन्हा अधोरेखित
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथील हॉटेल जगदंबा समोरील क्रॉसिंगवर गुरुवारी सकाळी साधारण नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. तीन स्पोर्ट बाईकस्वारांचा वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पोशी झालेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जवळपास एक तास उलटूनही घटनास्थळी पोलीस न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जखमींना तत्काळ जवळील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्याआधीच एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.
चौफुला येथील हे क्रॉसिंग अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही येथे अनेक भीषण अपघात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
चिन्हे नाहीत, सिग्नल नाहीत – मृत्यूला आमंत्रण
या क्रॉसिंगवर झेब्रा क्रॉसिंग, इशारा फलक किंवा सिग्नल यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने वाहनचालकांना पुढील परिस्थितीची कल्पना येत नाही. परिणामी अचानक येणाऱ्या वाहनांमुळे भीषण अपघात घडत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या 200 मीटर अंतरावर उड्डाणपूल आणि सर्विस रोडची सुविधा उपलब्ध असतानाही हे धोकादायक क्रॉसिंग सुरू ठेवण्यात आले आहे.
रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला या ठिकाणच्या धोक्याची पूर्ण कल्पना असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र टीका होत आहे. काही वर्षांपूर्वी वरवंड येथे अशाच प्रकारच्या क्रॉसिंगवर झालेल्या अपघातात पुणे जिल्हा दूध संघाचे तत्कालीन संचालक रामदास नाना दिवेकर गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडले होते.
तात्काळ कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर चौफुला येथील क्रॉसिंग तात्काळ बंद करावे किंवा तेथे सिग्नल, स्पीड ब्रेकर, इशारा फलक यांसारख्या आवश्यक सुविधा उभाराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यातही अशाच अपघातांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखाद्याचा जीव जात असताना तात्काळ मदत मिळत नसल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



