पुणे-सोलापूर महामार्गावर शिवशाही बसवर थरार: दरोड्याचा प्रयत्न की टोळीचा धुडगूस?


दोषींना वाचवण्याचा तपास अधिकाऱ्यांचा प्रयत्न? रावणगाव पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुणे/रावणगाव (प्रतिनिधी, आवाज लोकशाहीचा):
पुणे-सोलापूर महामार्गावर रावणगावच्या हद्दीत ९ फेब्रुवारी रोजी दुपारी शिवशाही बस अडवून चालकाला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना केवळ वैयक्तिक वादातून झाली की बस लुटण्याच्या उद्देशाने केलेला दरोड्याचा प्रयत्न होता, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयित आरोपी आणि तपास अधिकारी यांचे नातेसंबंध असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
सोलापूर आगाराची विना-वाहक शिवशाही बस (MH 06 BW 1152) ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान स्वारगेटहून सोलापूरकडे जात होती. रावणगाव हद्दीत आली असता, एका चारचाकी गाडीने (MH 42 BN 7798) बसचा रस्ता अडवला. गाडीतून उतरलेल्या ३ ते ४ अज्ञात इसमांनी बसच्या केबिनचे दार उघडून चालक अतुल गोवर्धन भोसले यांना काहीही विचारपूस न करता अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.



या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार चित्रित केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीत ५ ते ६ तरुण चालकाला बसबाहेर ओढून बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या हल्ल्यात चालक भोसले यांच्या डोक्याला, कानाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या कानातून रक्तस्त्राव सुरू झाला होता.


या प्रकरणी रावणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ नुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेले हवालदार श्री. भागवत यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप होत आहेत.
नातेवाईकांचा हस्तक्षेप? मारहाण करणारे युवक हे तपास अधिकारी भागवत यांच्या नात्यातील आणि एकाच समाजाचे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न? गुन्हा घडून तीन दिवस उलटले तरी ठोस कारवाई का झाली नाही? नातेवाईकांना वाचवण्यासाठी तपास अधिकारी आपली इच्छाशक्ती वापरत असल्याची ओरड पीडित पक्ष आणि नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांची चुप्पी: या संदर्भात माहिती घेण्यासाठी तपास अधिकारी भागवत आणि पोलीस अधिकारी गोपाळ पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरोडा की मारामारी?
महामार्गावर अशा प्रकारे अचानक बस अडवून चालकावर हल्ला करणे हा केवळ योगायोग नसून, तो बस लुटण्याचा किंवा दरोड्याचा प्रयत्न होता का, या दिशेनेही संशय व्यक्त केला जात आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर न आणल्यास, खाकी वर्दीवर होणारी चिखलफेक रोखणे कठीण जाईल. चालक अतुल भोसले यांना न्याय मिळतो की पोलीस आपल्या ‘नातेवाइकांसाठी’ कायद्याची बाजू कमकुवत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बस चालकाला मारहाण करताना