दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील वरवंड येथे महसूल विभागातील एका कोतवालाने गॅस पंपावर सरकारी रुबाब दाखवत कर्मचाऱ्याशी अरेरावी केल्याची घटना सोमवारी दि. ९ रोजी सकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे गॅस भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कोतवालाने एमएच १२ वाय ४९४९ क्रमांकाची गाडी उलट्या बाजूने आडवी लावत “मी गाडी हलवणार नाही, इथंच गॅस भरावा लागेल” अशी दमदाटी सुरू केली. गाडीत त्याचे काही सहकारीही उपस्थित होते. “आम्हाला ड्युटीला जायचे आहे, लवकर गॅस भरा,” अशी तंबी तो कर्मचाऱ्याला देत होता.
दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्याने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कोतवालाने तहसीलदार असल्याप्रमाणे वर्तन करत हातवारे करून उग्र भाषेत
कर्मचाऱ्याशी बोलणे सुरूच ठेवले. “मी महसूलमध्ये काम करतो, फाईल गायब करू शकतो, सही मिळवून देणार नाही,” अशा स्वरूपाची दमबाजी यापूर्वीही त्याच्याकडून होत असल्याची चर्चा नागरिकांत ऐकायला मिळाली. तहसील कार्यालयात वारंवार कामानिमित्त जावे लागते, त्यामुळे “उगाच पंगा नको” या भीतीपोटी कोणीही अधिकृत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे सांगितले जाते.
मात्र गॅस पंपावरील या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत “हा कोण अधिकारी आहे, इतका रुबाब कशाला?” असा सवाल उपस्थित केला. या घटनेदरम्यान ‘आवाज लोकशाहीचा’च्या वतीने संबंधितास जाब विचारण्याचा प्रयत्न होताच तो व त्याचे सहकारी तेथून निघून गेले. विशेष म्हणजे, गॅस न भरताच त्यांनी पळ काढल्याचेही साक्षीदारांनी सांगितले.
सरकारी पदाचा धाक दाखवत सर्वसामान्यांशी अरेरावी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित होत आहे. महसूल प्रशासन या घटनेची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले



