आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड मध्ये बालकाच्या मृत्यूनंतर नागरिकांचा PWD अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी
दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरू असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कामा दरम्यान एका बालकाचा रोडरोलर खाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणी नागरिकांनी दौंड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेली दोन वर्षे या प्रभागातील रस्त्याचे काम अपूर्ण असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नव्हती.
घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली नाही, तसेच नागरिकांच्या संपर्कालाही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरपालिकेच्या हद्दीत असूनही हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून का सुरू आहे, हा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पालिकेचा स्वतंत्र बांधकाम विभाग असताना बाह्य विभागाकडे काम देण्यामागील प्रक्रिया व कारणांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
तसेच या कामामध्ये ठेकेदार, यंत्रणा आणि जबाबदारी याबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप करण्यात येत असून, कामाच्या नियोजनात व देखरेखीमध्ये त्रुटी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




