दौंड : आवाज लोकशाहीचा : प्रतिनिधी : विजय चव्हाण
आई उपनगराध्यक्ष झाली आणि त्या क्षणात मुलाच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारा आनंद शब्दांत मावणारा नव्हता. हा हृदयस्पर्शी क्षण घडला दौंड नगरपरिषद येथे छाया थोरात यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीवेळी. नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर १५ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. नागरिक संरक्षण मंडळाच्या वतीने छाया थोरात यांची एकमुखाने उपनगराध्यक्षपदी निवड झाली. मात्र या औपचारिकतेपेक्षा अधिक लक्ष वेधून घेतले ते माय-लेकरांच्या नात्यातील त्या अविस्मरणीय भावनेने.
आईच्या सन्मानाचा क्षण समोर उभा असताना, तिच्या पाठीशी अखंड उभा राहिलेला सुपुत्र सतीश थोरात आईबरोबरच्या छायाचित्रात त्याचा आनंद शब्दांविना व्यक्त होत होता. आयुष्यभर लेकरांच्या भवितव्यासाठी झिजणारी आई, आणि त्याच आईच्या स्वप्नपूर्तीसाठी जीव ओतणारा मुलगा या नात्याची साक्ष देणारा तो क्षण अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
दौंड शहरातील दलित संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते असलेले सतीश थोरात यांनी यापूर्वी आरपीआय पक्षात जबाबदारीची पदे भूषवली आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत आईच्या विजयासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. केवळ निवडणूक जिंकवणेच नव्हे, तर आई उपनगराध्यक्षपदी विराजमान होईपर्यंत त्यांनी आपल्या कर्तृत्वाची, संघटनशक्तीची आणि निष्ठेची कसोटी लावली. त्या कष्टांचे चीज झाले आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या निर्मळ आनंदातून स्पष्ट दिसत होते.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महिला नगराध्यक्ष, तर नागरिक संरक्षण मंडळाच्या वतीने छाया थोरात उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या. यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एक, तर नागरिक संरक्षण मंडळाकडून दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. हा सारा सोहळा नगरपरिषदेच्या इमारतीत पार पडला.
मात्र या राजकीय घडामोडीं मध्येही सर्वाधिक जिव्हाळ्याचे, सर्वाधिक अर्थपूर्ण चित्र ठरले आई आणि मुला मधील अभिमान, कृतज्ञता आणि स्वप्नपूर्तीचा तो क्षण. हा केवळ निवडीचा उत्सव नव्हता; तो नात्यांचा, त्यागाचा आणि विश्वासाचा विजय होता.



