४०९ कोटींचा निधी आणि रस्ता दौंड करासाठी बनले गूढ ,रस्ता निधी देणारे अधिकारी सध्या तरी अदृश्य?

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण……..
दौंड तालुक्यात ४०९ कोटी ४० लाखांचा रस्ता की केवळ फलक?
निधी, विभाग, अधिकारी अन् मार्ग — सर्वच बाबी धुसर
दौंड तालुक्यातील ४०९ कोटी ४० लाख रुपयांच्या अंदाजपत्रिकीय रस्ते निधी भोवती मोठा गोंधळ निर्माण झाला असून, या निधीचा खरा कर्तबगार कोण, निधी देणारा विभाग कोणता, संबंधित कार्यालय कुठे आणि जबाबदार अधिकारी कोण — हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. परिणामी, हा रस्ता अस्तित्वात आहे की नाही, की केवळ कागदोपत्री आणि फलकांपुरताच मर्यादित आहे, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र शंका आणि अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील गावागावांत विकासकामांचे फलक झळकले. रस्ते, पाणी, वीज, बांधकाम आदी कामांवर झालेला आणि होणारा खर्च ठळकपणे मांडण्यात आला. याच फलकांमध्ये ‘लोहगाव–राहू–यवत–पारगाव’ या रस्त्याची नोंद आणि त्यासाठी ४०९ कोटी ४० लाखांचा खर्च दाखवण्यात आला. मात्र, फलकावर आकडे आहेत; प्रत्यक्षात रस्ता कुठे आहे, हेच समजेनासे झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राहू–परश्यातील नागरिक आणि ‘आवाज लोकशाहीचा’ माध्यमातून या रस्त्याचा शोध सुरू आहे. शोधादरम्यान निधी देणारे कार्यालय, संबंधित विभाग, अधिकाऱ्यांची नावे, रस्त्याचा नेमका मार्ग, कामाची व्याप्ती आणि स्वरूप — यापैकी एकही बाब ठोसपणे समोर आलेली नाही. उलट, माहिती मिळण्याऐवजी गोंधळच अधिक वाढताना दिसतो आहे.
या रस्त्याचे नाव आणि मार्गाबाबतची नोंदही अत्यंत विचित्र आहे. लोहगाव हा शहरी विकास विभागातील भाग असताना, राहू–यवत–पारगाव असा मार्ग नेमका कोणत्या रेषेत, कोणत्या जमिनीवरून आणि कोणत्या प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीतून जाणार आहे, याची माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे हा रस्ता खरंच मंजूर आहे की केवळ कागदांवर मंजुरी दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांत हजारो कोटींचा विकासनिधी आल्याचा दावा सातत्याने करण्यात आला. लोकप्रतिनिधी फलकांवर निधीचे श्रेय घेतात, आणि सामान्यतः जनता त्यावर विश्वास ठेवते. मात्र, ४०९ कोटी ४० लाखांच्या या निधीने तो विश्वास डळमळीत केला आहे. कारण निधी कोणी दिला, अधिकारी कोण, ठेकेदार कोण, काम सुरू आहे की बंद, होणार की नाही — या सर्व प्रश्नांवर संपूर्ण मौन पाळले जात आहे.
परिणामी, हा रस्ता आता विकासाचा नव्हे तर संशय, कुशंका आणि गूढतेचा विषय ठरला आहे. नागरिकांसाठी हा रस्ता प्रत्यक्षात ‘शोध मोहिमेचा’ भाग बनला असून, त्याचा अधिकृत खुलासा करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने ४०९ कोटी ४० लाखांचा हा रस्ता म्हणजे एक मोठे गुपितच बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.