पारगाव परिसर हादरला : शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग ; शिक्षकावर POCSO व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आवाज लोकशाहीचा

यवत | प्रतिनिधी…

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेतील शिक्षकानेच १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्गात विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संबंधित शिक्षकावर POCSO, BNS व अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी अल्पवयीन विद्यार्थिनी व इतर ५ ते ६ विद्यार्थिनी शाळेतील प्रदर्शनाच्या तयारीसाठी वर्गात उपस्थित होत्या. याचवेळी आरोपी शिक्षक प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे (रा. पारगाव, ता. दौंड) वर्गात आला.
आरोपीने “आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू” असे सांगत फिर्यादीचा उजवा हात पकडून तिच्या शेजारी बाकावर बसून असभ्य वर्तन करत विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. १०६३/२०२५अन्वये

BNS कलम ७४

POCSO कायदा कलम ८व १२

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम 3(1)(w)(i)
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्हा दि. १८ डिसेंबर रोजी रात्री ११.४३ वाजता नोंदविण्यात आला असून, दाखल अंमलदार पो.हवा.१३१४ वलेकर आहेत.
प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड उपविभाग) करत आहेत.

या घटनेमुळे पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून,
“शाळा सुरक्षित राहिल्या नाहीत का? शिक्षकांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?”
असे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाची जबाबदारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.