हडपसरमध्ये आदिवासी कोळी महादेव समाजाचा राज्यव्यापी वधू–वर परिचय मेळावा
आवाज लोकशाहीचा
वरवंड (ता. दौंड) :
आदिवासी कोळी महादेव समाजातील विवाहविषयक वाढत्या अडचणींवर मात करण्यासाठी समाज हिताचा, संवेदनशील आणि आशादायी असा अभिनव उपक्रम हडपसर येथे साकार होणार आहे. आदिवासी कोळी महादेव समाज उन्नती संस्था, पुणे यांच्या वतीने राज्यव्यापी वधू–वर परिचय मेळावा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
आजच्या काळात समाजातील अनेक वधू–वरांचे वय वाढत चालले आहे. अवास्तव अपेक्षा, पत्रिकेतील दोष–गुणमिलनाचे अडथळे, तसेच दलाल व एजंट मार्फत होणारी फसवणूक आणि अवाजवी शुल्क यांमुळे विवाह प्रक्रिया रखडत असल्याचे वास्तव समाजासमोर उभे आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय हस्तक्षेप न ठेवता, निधी संकलनाचा गाजावाजा टाळून आणि समाजाच्या एकजुटीच्या बळावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे, हे विशेष उल्लेखनीय ठरत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेली ही संस्था गेल्या काही काळापासून समाजातील वधू–वरांचे विवाह विनामूल्य जुळवून देण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. मोबाईलच्या माध्यमातून कोळी महादेव वधू–वर WhatsApp ग्रुप १, २ व ३ असे तीन स्वतंत्र गट तयार करून आतापर्यंत अनेक शुभविवाह यशस्वीपणे घडवून आणण्यात संस्थेला यश आले आहे. या ग्रुपमध्ये २,००० ते २,५०० पेक्षा अधिक कोळी बांधव सक्रिय सहभाग नोंदवत असून, समाजातील तरुण–तरुणींसाठी ही एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरत आहे.
हडपसर येथे होणारा हा मेळावा काही निवडक कोळी बांधवांनी लोकवर्गणीतून आणि स्वयंस्फूर्तीने आयोजित केला असून, “समाजासाठी समाजानेच उभारलेला” असा हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वधू–वर तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावेत, असे आवाहन संस्थेचे संस्थापक गोविंद गायकवाड, उपसंस्थापक शिवाजीराव शिंदे तसेच सर्व संचालक मंडळाने केले आहे.
हा वधू–वर परिचय मेळावा केवळ विवाह जुळविण्या पुरता मर्यादित न राहता, आदिवासी कोळी महादेव समाजातील ऐक्य, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




