गरुडा इन्फ्राचा अका कोण ,दौंड तालुक्यात वादळी चर्चा”!

आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त | विजय चव्हाण



दौंड तालुक्यात गेल्या काही दिवसांत एकच नाव चर्चेत आलं आहे — गरुडा इन्फ्रा कंपनी!
या कंपनीला एकाच वेळी तब्बल ११ कामांचा ठेका देण्यात आला आहे. हा ठेका कोणत्या कायद्याच्या आधारे दिला गेला? कोणत्या विशेष अधिकारात अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला? — या प्रश्नांनी तालुक्यातील प्रशासन आणि ठेकेदारी वर्तुळात खळबळ माजवली आहे.

“आवाज लोकशाहीचा” माध्यमातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही चर्चा ग्रामीण भागापासून शहरापर्यंत जोर धरत असून, अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारे ठेकेदार ‘गरुडा’च्या हस्तक्षपाणे हादरलेले दिसत आहेत.

अदृश्य शक्तीचा हात की “अका”चा आशीर्वाद?

या सगळ्या घडामोडींमागे “अदृश्य शक्ती” म्हणजेच “अका” असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
अचानकच एक कंपनी जन्माला येते, आणि ती कंपनी दौंड तालुक्याच्या चार दिशांतील वेगवेगळ्या किलोमीटरवरील गावांमध्ये — डाळिंब, मसनरवाडी, टाकळी, राहू बेट— अशी कामे घेते!
शासन नियमांनुसार अंतराच्या आधारे टेंडर देण्याची अट असतानाही त्याकडे सरळपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

यामुळे एकाच कंपनीकडे सर्व कामे देण्यामागचा हेतू शंकेखाली आला आहे.
“गरुडाला दिलेल्या ठेक्यांचा दर्जा काय?” — हा प्रश्न आता नागरिक आणि ठेकेदार खुलेपणे विचारू लागले आहेत.

औद्योगिक ठेक्यांपर्यंत अका चा प्रभाव!

केवळ रस्ते व बांधकामच नव्हे तर औद्योगिक वाहतूक क्षेत्रातही “गरुडा”ने कारभाराचे पंख पसरलेले आहेत.
ही सगळी हालचाल अका च्या आशीर्वादाने सुरू असल्याचा ठाम आरोप ठेकेदारांमध्ये होत आहे.
“गरुडा इन्फ्रा”चा जन्म म्हणजेच अका च्या ‘काळ्या कमाईला’ पांढरे करण्याची  नामी युक्ती असल्याचीही चर्चा तालुक्यात गाजते आहे.

पुणे मनपात कळ्या यादीतील कारभारी ठेकेदार!

पुणे महानगरपालिकेच्या “कळ्या यादी”त असलेला एक कारभारी, “गरुडाचे” तीन आधारस्तंभांपैकी एक मानला जातो.
मागील तीन वर्षांत या व्यक्तीचा व्यवसाय प्रचंड वाढला असून त्याने परदेशातही उद्योग विस्तार केला आहे.
“अशा झपाट्यात उद्योग वाढवणाऱ्या या ठेकेदाराचा खरा स्रोत काय?” — हा संशय आता उघडपणे व्यक्त होत आहे.

आशीर्वादाचा अधिकारी सल्लागार?

बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने आपल्या मनमानी कारभाराने अनेक वर्ष तालुक्यात हुकूमत गाजवली.
त्याच अधिकाऱ्याने “गरुडा”ची उभारणी करण्यासाठी हुशारी पणाला लावल्याची चर्चा सुरू आहे.
या अधिकाऱ्याने अलीकडेच बदलीसाठी इच्छेनुसार ठिकाण मिळवले असून,
“आशीर्वादाची फेड गरुडाच्या स्थापनेतून केली का?” — असा प्रश्न नागरिकांमध्ये घुमू लागला आहे.

१८७ ठेकेदारांचे आयुष्य उद्ध्वस्त!

तालुक्यातील १८७ ठेकेदार आता गरुडाच्या सावलीत दबलेले आहेत.
त्यांना राजकीय आशीर्वाद असलेल्या या समूहाविरुद्ध बोलणे म्हणजे स्वतःचे भविष्य धोक्यात घालणे!
अनेक ठेकेदारांनी “आवाज लोकशाहीचा”शी बोलताना भीती व्यक्त केली की —
“आम्ही आवाज उठवला, तर तालुक्यात आमचं काम बंद होईल. गरुडाचे थैमान थांबवणं म्हणजे स्वतःचं आर्थिक आत्महत्येसमान आहे.”
गरुडाची पुढील योजना — “सगळं माझंच!”

गरुड कंपनी आता “तालुक्यातील सर्व टेंडर, सर्व कामे, सर्व मार्ग माझेच” या धोरणावर काम करत असल्याचा आरोप आहे.
अका च्या नावाखाली वेगवेगळ्या “गरुडा” नावाच्या कंपन्या सुरू करून,
भक्तांना नावालाच भागीदार दाखवले जात आहे, खरा मालक मात्र एकच!

अका कोण? आणि एवढं सगळं अचानक कसं?

“अका कोण?” हा प्रश्न आता दौंड तालुक्याचा चर्चेचा मुख्य विषय झाला आहे.
चहा स्टॉल, पान दुकान, राजकीय कार्यालये — सर्व ठिकाणी एकच चर्चा सुरू आहे:

“कोण आहे हा अका? आणि गरुडा इन्फ्राच्या उड्डाणामागचा खरा हात कोणाचा?”


आवाज लोकशाहीचा पुढे या प्रकरणाचा सखोल तपास करणार असून, अका चं साम्राज्य आणि प्रशासनातील संबंधांचे धागे एकामागून एक उलगडणार आहेत.

हा केवळ ठेक्यांचा प्रश्न नाही — ही दौंड तालुक्यातील अका आड लपलेली “ठेकेदारी लोकशाही”ची शोकांतिका आहे!