दौंड पंचायत समितीतील ‘राजकीय लाडोबा कनिष्ठ अभियंता’चा कारभार — ठेकेदाराचा जिल्हा परिषदेसमोर उपोषण!



मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दहा दिवसांची मुदत; प्रशासनातील गोंधळ उघडपणे समोर

आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण, विशेष प्रतिनिधी

दौंड तालुक्यातील पंचायत समितीच्या पाणी विभागात राजकीय आशीर्वादाने डोकं वर काढलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदाराला थेट उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे.
प्रवीण कदम असे उपोषण करणाऱ्या ठेकेदाराचे नाव असून, पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर त्यांनी आंदोलन छेडले होते. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण दहा दिवसांसाठी स्थगित केले.

अभियंत्याचा ‘एसीतला अंदाजपत्रक’ ठेकेदारासाठी जीवघेणा!

गलांडवाडी (ता. दौंड) गावातील नळपाणीपुरवठा योजनेत नवीन वीज पंप बसविण्याचे काम कदम यांना मिळाले होते. नियमानुसार, पंपाची वीज क्षमता, पाण्याची खेच क्षमता इत्यादी बाबी शाखा अभियंत्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासून अंदाजपत्रक तयार करणे अपेक्षित होते.
मात्र संबंधित ‘लाडका’ अभियंता वातानुकूल कार्यालयात बसूनच अंदाजपत्रक तयार करत होता, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कदम यांनी त्या अंदाजपत्रकानुसार पंप खरेदी करून बसवला. पण, प्रत्यक्षात पंप अपेक्षित क्षमतेने पाणी खेचत नव्हता. तज्ञांकडून तपासणी केल्यानंतर उघडकीस आले की अभियंत्याने तयार केलेल्या अंदाजपत्रकातील तपशील आणि प्रत्यक्ष गरज यामध्ये प्रचंड तफावत होती.