सुपे(तालुका बारामती) …प्रतिनिधी….
गावाच्या चौकातच जुगाराचे अड्डे, मटक्याचे तिकीट आणि दारूची सराईश ठिकठिकाणी उघडी… आणि तरीही गावात पोलिस ठाणे असताना हा उघड बेकायदेशीर धंदा सुरू! ही परिस्थिती पाहता “गावात पोलीस आहेत की पोसलेले?” असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे तक्रारी करूनही कारवाई होत नाही. उलट धंदे दिवसेंदिवस फोफावत चालले आहेत. त्यामुळे या मागे कोणाचे राजकीय पाठबळ आहे की पोलीस व्यवस्थेची थेट मूकसंमती? असा संशय व्यक्त होत आहे.
अवैध धंद्यांचा परिणाम समाजावर मोठा होत असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झपाट्याने ओढली जात आहे. गावोगावी घरगुती कलह, चोरी व गुन्हेगारी वाढीस लागली आहे. “गावाच्या चौकात गुन्हेगार मिरवतात आणि सामान्य जनता भयभीत होते, हा लोकशाहीचा अपमान नाही का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सामाजिक संस्था व तरुण मंडळांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “यावर कठोर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सुपेत पोलीस ठाणे असतानाही चौकातच अवैध धंदे सुरू राहणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवणारे धक्कादायक वास्तव ठरते.



