आवाज लोकशाहीचा विशेष वृत्त
पडवी (ता.दौंड) :
पडवी गावातील मुरूम तस्करीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या गावातील एका तस्कराने महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या वशिल्याच्या जोरावर गप्प केले असून, थेट दौंड तहसील कचेरीपर्यंत त्याचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू आहे.
गावातील मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यावर या तस्कराचा इतका दबदबा निर्माण झाला आहे की, कारवाई करण्याऐवजी अधिकारी ‘थंडगार’ झालेत, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. या तस्कराला महसूल खात्यातील एका महिला नातेवाईकाचा थेट आशीर्वाद असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटतो आहे.
या तस्कराच्या ‘परवानगीशिवाय’ इतर कोणी मुरूम उत्खननाला हात घालण्याचे धाडस करीत नाही. जर कोणी प्रयत्न केला, तर तो संबंधित महिला अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोचवतो आणि अडचणी निर्माण करून सोडतो. एवढेच नव्हे तर आर्थिक तडजोडीचा भाग म्हणून काही ‘मानधन’ देण्याची पद्धतही सुरू असल्याच्या तक्रारी जनतेतून होत आहेत.
दौंडचे तहसीलदार शेलार यांच्याकडे या तस्करीचे फोटो-व्हिडिओ पोचले होते. त्यांनी संबंधित मंडल अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवले होते. मात्र, तस्कराचा वशिला तहसीलदारांपेक्षाही मोठा असल्याने कारवाईचा परिणाम आजवर शून्य ठरला आहे. उलट मंडल अधिकारी आणि तलाठी यांना धमक्या देत, “तुमच्या बदल्या मीच करीन” अशा दबंग शैलीत भाषा वापरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शासनाच्या ठेकेदारीची कामे करणारा हा तस्कर आता महसूल प्रशासनावर ‘पाहुणे बाईंच्या आशीर्वादाने’ दादागिरी गाजवत असल्याची चर्चा रंगली आहे. “ही पाहुणे बाई नेमक्या कोण?” हा प्रश्न नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
मध्यंतरी या तहसील कार्यालयात लाचलुचपत विभागाची कारवाई झाल्याचे लक्षात घेता, मुरूम तस्कराला मिळणारे ‘आतील पाठबळ’ नक्की कोण देते, यावर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, परिसरातील टेकड्या सपाट होत असून निसर्गाचा उघडपणे ऱ्हास सुरू आहे. महसूल प्रशासन डोळेझाक करून बसल्याने, “या बेफिकीर मुरूम तस्करीला लगाम घालणार तरी कोण?” असा सवाल नागरिकांमध्ये वादळी चर्चेतून पुढे येत आहे.




