आवाज लोकशाहीचा
दौंड प्रतिनिधी :
दौंड तालुक्यात महसूल विभागातील एका महिला अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने मुरूम तस्करीचा मोठा राक्षस उभा राहिला आहे. या तस्कराला स्थानिक राजकारणाचे छत्रछायाही मिळाल्याने त्याची दादागिरी इतकी वाढली आहे की पडवी परिसरातील ग्रामस्थ अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
पोकलेनसारखी अवजड यंत्रे लावून डोंगरांची हाडं फोडली जात आहेत, टेकड्यांचे लचके तोडले जात आहेत, काही डोंगर सपाट होऊन नष्ट झाले आहेत आणि काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाचा हा नरसंहार महसूल प्रशासन आणि राजकीय आश्रयानेच होत असल्याचे लोक उघडपणे सांगत आहेत.
सदर तस्कर स्वतःला शासकीय ठेकेदार म्हणवून घेतो, पण प्रत्यक्षात मुरूम चोरी आणि दहशत माजवणे हा त्याचा मूळ धंदा आहे. ठेकेदारीच्या नावाखाली अधिकाऱ्यांची व त्याची मिलीभगत सुरू असून कामाची गुणवत्ता हा शब्दच या ठेकेदाराच्या शब्दकोशात नाही.
ग्रामस्थांनी आवाज उठवला की उलट धमकी मिळते – “जा, जे करायचं असेल ते करा” – अशी उघडी दादागिरी. नागरिकांच्या तक्रारींना महसूलातील संबंधित महिला अधिकारी पाठराखण करत असून तिच्या नात्याचे राजकीय छत्र तस्कराला धुडकावून बोलण्याची ताकद देते.
आज पडवी, देऊळगाव गाडा परिसरात निसर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. डोंगर टेकड्या कोसळत आहेत, पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे, पण महसूल प्रशासन ‘मूकबधीर’ आहे. ही तस्करी म्हणजे केवळ मातीची लूट नव्हे तर भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांवर उघड दरोडा आहे.

मुरूम तस्कर हा अधिकाऱ्यांच्या नात्यात आला की कायद्यापुढे तो पवित्र गाई ठरतो का?गावकुस फोडणारी पोकलेन थांबवणार कोण?आशीर्वादाने चालणारा हा ‘मुरूम साम्राज्याचा राजा’ किती दिवस बेभरवशाचा रुबाब मिरवणार?आहे अशी लोक चर्चा जोर धरत आहे
ही लूट, ही दादागिरी, हा महसूल-राजकीय संगनमताचा खेळ थांबला नाही तर तालुक्याचे डोंगर, शेती आणि ग्रामजीवन उदध्वस्त होणार हे आता उघड गुपित झाले आहे.
मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी त्याच्या पुढे नांगी टाकली असून त्याच्याकडून मिळणाऱ्या चिरीमिरी मुळे ते मिंधे झाल्याचे दिसून येते आहे .एरवी नागरिकांच्या जमिनीवर गौण खनिजे चोरीची कारणे दाखवून जमिनीवर बोजा चढवण्याची भाषा बोलणारे मंडल अधिकारी गुडघ्यात मान घालून गप्प बसल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे संपर्क केल्यास ते फोन घेत नाहीत



