आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त | विजय चव्हाण
पहाटेच्या अपघाताने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; परिसरात बिबट्या असल्याची अफवा नव्हे, तर नागरिकांमध्ये भीती आणि चर्चांना उधाण
केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव–चौफुला रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे दहा वर्षे वयाच्या तरस जातीच्या मादी वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या प्राण्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी रस्त्यावर हा मोठ्या आकाराचा वन्यप्राणी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. केडगाव–चौफुला हा नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असणारा मार्ग असल्याने रस्त्यावर पडलेल्या या प्राण्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्राण्याच्या डोक्यातून आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचे दृश्य अत्यंत विदारक होते.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दौंड वनविभागाचे अधिकारी राहुल. काळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचारी सोनाली चव्हाण घटनास्थळी धाव घेत मृत प्राण्याला ताब्यात घेतले. पुढील तपासणी व आवश्यक वैद्यकीय प्रक्रियेसाठी त्याला केडगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा वन्यप्राणी मृतावस्थेत आढळला, त्या ठिकाणापासून काही अंतरावर पश्चिम बाजूला मेंढ्यांचा मुक्काम होता. त्यामुळे मेंढ्या किंवा शेळ्यांच्या उपस्थितीमुळे हा प्राणी त्या परिसरात आला असावा आणि रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसली असावी, असा प्राथमिक अंदाज काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंगावरील पट्टे, दाट केस आणि मोठी शरीरयष्टी यामुळे तरस हा प्राणी अनेकांना सुरुवातीला वाघ किंवा बिबट्यासारखा भासतो. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये हा नेमका कोणता वन्यप्राणी आहे, याबाबतही चर्चा रंगली होती. मात्र हा तरस जातीचा प्राणी असल्याचे समोर आले.
मृत मादी तरसाच्या परिसरात नर तरस किंवा तिचे बछडे असण्याची शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ चर्चांमुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होऊ शकते.
मानवी वस्ती, मेंढपाळांचे मुक्काम आणि वाहनांची सतत वर्दळ असलेल्या परिसरात वन्यप्राण्याचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. रस्त्यालगत वन्यजीवांचा वावर असल्यास वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तसेच वनविभागाने या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींची पाहणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका वन्यजीवाचा मृत्यू ही केवळ अपघाताची घटना नसून मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संघर्षाची धोक्याची घंटा आहे. आता वनविभागाच्या तपासणीत या घटनेमागील नेमके कारण काय समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




