.नेत्याला पद मिळवून देण्यासाठी बापाविरुद्ध पोरगा?  कुरकुंभ औद्योगिक नगरीच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्षाचा आरोप




आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण विशेष वृत्त
कुरकुंभ : औद्योगिक आणि व्यवसायाची नगरी म्हणून देश-विदेशात ओळख निर्माण केलेल्या कुरकुंभमध्ये सध्या विकासाच्या प्रश्नांपेक्षा स्थानिक राजकारणातील अंतर्गत संघर्षाचीच अधिक चर्चा रंगू लागली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदान प्रतिनिधी निवडीच्या प्रक्रियेदरम्यान घडलेल्या एका घटनेने या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, वडिलांच्या विरोधात मुलाला उभे करण्यामागे नेमके कोणाचे राजकीय डोके होते? याचा ‘मास्टरमाइंड’ कोण? असा सवाल आता कुरकुंभ परिसरात उपस्थित केला जात आहे. बापाने मुलाला मिठी मारली, मात्र निवडणूक प्रतिनिधी प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामागे पडद्याआडून सूत्रे कोण हलवत होते, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
घर फोडणारे डोके गावाच्या प्रश्नांवर गप्प का?
स्थानिक राजकारणात पद, सत्ता आणि नेत्यांवरील निष्ठेसाठी कुटुंबातीलच व्यक्तींना एकमेकांसमोर उभे केले जात असेल, तर हा प्रकार लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. घरातील भांडण पेटविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राजकीय शक्तींनी कुरकुंभच्या मूलभूत प्रश्नांवरही तितकीच आक्रमक भूमिका घेतली का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
कुरकुंभ परिसरात अवैध धंदे, गॅसच्या कथित काळाबाजारासह विविध गैरप्रकारांच्या चर्चांना उधाण आले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी यापूर्वी कारवाई करून एका प्रकरणात स्थानिक राजकीय व्यक्तीच्या नातेवाइकावर कारवाई केल्याचीही चर्चा आहे. मात्र, घरातील व्यक्तीला राजकीय मैदानात उतरविणारे ‘डोके’ अशा प्रश्नांवर शांत का राहिले? असा टोला नागरिकांकडून लगावला जात आहे.
परप्रांतीयांची वाढती गर्दी; अवैध व्यवसायांच्या चर्चांना खतपाणी
कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची वर्दळ वाढली असून, त्यातून काही ठिकाणी संशयास्पद व बेकायदेशीर व्यवसायांचा पसारा वाढत असल्याची चर्चा आहे. या विषयाकडे प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेतृत्वाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दौंड तालुक्यातील राजकारणाबाबत आणखी एक गंभीर चित्र पुढे येत आहे. नेत्यावरील निष्ठा जपताना गावाच्या विकासाचे प्रश्न मात्र मागे पडत आहेत का? असा सवाल आता विचारला जात आहे.
गावातील रस्ते, पाणी, शिक्षण, रोजगार, शेतमालाचे बाजारभाव आणि विकासकामांची गुणवत्ता यासारखे प्रश्न कायम असताना, राजकीय नेत्यांच्या समर्थन-विरोधाभोवतीच कार्यकर्त्यांची ऊर्जा खर्च होत असल्याची टीका होत आहे.
विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता आणि जमिनीवरील परिस्थिती यामध्ये तफावत असल्यास त्याची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. निधी किती आला, खर्च किती झाला आणि प्रत्यक्ष काम किती झाले—याचा सार्वजनिक हिशोब नागरिकांना मिळणार का? हा खरा प्रश्न आहे.
तरुण बेरोजगार, शेतकरी अडचणीत; राजकारण मात्र तापलेले!
तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांना मिळणारा बाजारभाव, पिण्याच्या पाण्याची समस्या, शाळांमधील शिक्षकांची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता असे अनेक प्रश्न दौंड तालुक्यासमोर उभे आहेत.
एका बाजूला शिक्षणासाठी इमारतींची रंगरंगोटी आणि विविध कामांवर खर्च होत असल्याचे चित्र दिसते; तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळतात का, शिक्षकांची संख्या पुरेशी आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा राजकीय निष्ठा मोठी होऊ लागली तर तालुक्याचे भविष्य कोण घडवणार?
राजकीय नेत्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रश्न न विचारता समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरही नागरिकांमधून टीका होत आहे. नेत्याचे समर्थन करणे हा प्रत्येकाचा राजकीय अधिकार आहे; मात्र गावात निकृष्ट काम झाले, भ्रष्टाचाराचा संशय निर्माण झाला किंवा मूलभूत प्रश्न निर्माण झाले तर त्यावर प्रश्न विचारणे हीदेखील लोकशाहीतील निष्ठाच आहे, असे जाणकारांचे मत आहे.
नेत्याच्या जवळ राहण्यासाठी गावातील प्रश्नांकडे डोळेझाक केली जात असेल, तर अशा राजकारणातून विकासाऐवजी गटबाजी, वैर आणि शेवटी गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळण्याचा धोका असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
कुरकुंभसारख्या औद्योगिक नगरीला घराघरात फूट पाडणारे राजकारण नको; रोजगार, उद्योग, पाणी, शिक्षण आणि दर्जेदार विकास हवा आहे.
कुरकुंभचे राजकारण कोणासाठी? गावासाठी की पदासाठी?
या सर्व आरोपांबाबत संबंधित राजकीय पदाधिकारी, संस्था आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, हे समोर येणे आवश्यक आहे.