आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण विशेष वृत्त
सहजपूर : सहजपूर ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांसाठी उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चाबाबत गावासह वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशय आणि चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांच्या नावाखाली काही रकमा वारंवार काढण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, काही नागरिकांकडे ऑनलाइन बँक व्यवहारांचे दाखलेही असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेषतः नळपाणी पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली एकाच महिन्यात अनेक वेळा रकमा काढण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. कोरोना महामारीला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या कालावधीशी संबंधित काही बिलांच्या रकमा अलीकडे काढण्यात आल्याचे ऑनलाइन बँक खात्यांमधील व्यवहारांवरून दिसत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित देयके, बिले, कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि बँक व्यवहार यांची पडताळणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
एकाच ठेकेदाराभोवती विकासकामांचा कारभार?
गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे करण्यात आली. मात्र, या कामांमध्ये एकाच ठेकेदाराचे नाव वारंवार पुढे येत असल्याने कामे ‘मॅनेज’ केली जात आहेत का? असा गंभीर प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित सर्व कामांची निविदा प्रक्रिया, मंजुरी, अंदाजपत्रक, प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता, देयके आणि ठेकेदारांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे.
सहजपूर ग्रामपंचायत लोकसंख्येने तुलनेने छोटी असली तरी गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र असल्याने विविध माध्यमांतून ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध होतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आहे का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘बोगस बिलां’चा आरोप; ग्रामसेविकांकडून मात्र नकार
ग्रामपंचायतीतील काही विकासकामांची बिले बोगस असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, ग्रामसेविकांकडून असे प्रकार झाले नसल्याची माहिती दिली जात असल्याचे समजते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांपेक्षा शासकीय चौकशी करून सत्य समोर आणणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आठ बँक खात्यांतील व्यवहारांची चौकशी करा
ग्रामपंचायतीची एकूण आठ बँक खाती असल्याचे सांगितले जात असून, या सर्व खात्यांमधून गेल्या पाच वर्षांत किती निधी जमा झाला, कोणत्या योजनेतून आला, कोणत्या कामासाठी किती खर्च झाला, कोणाला देयके देण्यात आली आणि त्या कामांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याचा संपूर्ण तपशील तपासण्याची मागणी होत आहे.
निधी खर्च करताना कोणते निकष वापरण्यात आले, कामांची देखरेख करणारी शासकीय यंत्रणा कोणती होती, मोजमाप पुस्तिका व काम पूर्ण झाल्याची प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘संगनमत’ाच्या आरोपांची चौकशी होणार का?
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोजके गावपुढारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यात संगनमत असल्याचा आरोप काही नागरिक करीत आहेत. इतकेच नव्हे तर काही ग्रामपंचायत सदस्यांनाही खर्चाचा संपूर्ण तपशील माहिती नसल्याचा दावा केला जात आहे.
त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील सर्व बँक व्यवहार, विकासकामे, निविदा, ठेकेदार, बिले, मोजमाप पुस्तिका आणि कामांची प्रत्यक्ष गुणवत्ता यांचे स्वतंत्र व निष्पक्ष ऑडिट करण्याची मागणी आता पुढे येत आहे.
चौकशी झाली नाही तर उपोषणाचा इशारा
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याकडून उपोषणाचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती ‘आवाज लोकशाहीचा’ला नाव न छापण्याच्या अटीवर मिळाली आहे.
आता प्रशासन या आरोपांची दखल घेऊन सहजपूर ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार का? की नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाणार? याकडे सहजपूर परिसराचे लक्ष लागले आहे.



