दौंडच्या महिलांसाठी डिजिटल कौशल्य प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम; ६० महिलांचा पहिला टप्पा यशस्वी…,…अध्यक्षा,दुर्गादेवी जगदाळे

आवाज लोकशाहीचा..

विजय चव्हाण

दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून दौंड शहरातील गरजू व होतकरू महिलांसाठी नाममात्र शुल्कात MS-CIT व AI Digital Skills प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील ६० महिलांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले.
महिलांना केवळ संगणकाचे प्रमाणपत्र मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, त्यांच्यामध्ये डिजिटल कौशल्य, आत्मविश्वास, रोजगारक्षमता आणि स्वावलंबन वाढविणे हा मुख्य हेतू आहे. संगणक, ऑनलाइन सेवा, डेटा एंट्री, डिजिटल अकाउंटिंग तसेच AI आधारित विविध डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी वर्गाकडून सहकार्य आणि नोकरीच्या संधींबाबत हमी देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणासोबतच महिलांना रोजगाराच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या ६० महिलांच्या प्रशिक्षणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील टप्प्यात आणखी ६० महिलांची बॅच, त्यानंतर १०० महिलांची बॅच सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दौंड शहरातील अधिकाधिक महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी भविष्यातही कौशल्याधारित उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसीचे विशेष सहकार्य लाभले. रो. सुनील ठोंबरे, रो. राजेंद्र जगदाळे (अध्यक्ष), रो. अनिल शितोळे (सचिव), गणेश लबडे व किशोर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उल्हास मिसाळ व अर्चना मिसाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केले. क्रिएटिव्ह कॉम्प्युटर टीमचेही विशेष योगदान राहिले.
कार्यक्रमास नगरसेविका स्वाती निलेश सावंत, उज्वला मनीष परकाळे, प्रणिता दिगंबर शिंदे (जठार), राणी सुरज लष्करे तसेच इंद्रजीत जगदाळे आणि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
“महिलांना मदत करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्य देणे अधिक महत्त्वाचे आहे,” या विचारातून सुरू झालेला हा उपक्रम दौंड शहरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
“कौशल्यातून आत्मविश्वास, आत्मविश्वासातून रोजगार आणि रोजगारातून स्वावलंबन” या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम दौंडच्या महिलांना डिजिटल युगात नवी दिशा देणारा ठरणार आहे.