यवत–पाटस परिसरात गुटखा विक्रीचा खुलेआम आरोप; प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह


आवाज लोकशाहीचा — विजय चव्हाण
यवत परिसरात गुटखा विक्रीचा व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक नागरिकांकडून होत असलेल्या आरोपांनुसार, ‘अजित’ नावाचा गुटखा विक्रेता प्रशासनाच्या कारवाईला न जुमानता खुलेआम व्यवसाय करत असल्याचा दावा केला जात आहे. कितीही विरोध झाला तरी आपला व्यवसाय बंद होणार नाही, अशा तोऱ्यात हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे.
यवत परिसरातील गावागावात गुटख्याची फेरी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यामुळे संबंधित व्यक्तीला ‘गुटखा किंग’ म्हणून संबोधले जात असल्याची चर्चा आहे. याचबरोबर पाटस परिसरातही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप होत आहे. विविध मान्यवरांसोबतचे फोटो दाखवून आपली मोठी ओळख असल्याचा दावा केला जात असल्याचीही चर्चा आहे.

गुटखा विक्रीच्या या कथित व्यवसायाला प्रशासनाकडून संरक्षण मिळते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनातील काही व्यक्तींना नियमितपणे पैसे दिले जात असल्याच्या आरोपांची चर्चा नागरिकांमध्ये आहे; मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
यवत या ठिकाणी पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या परिसरातही गुटख्याची विक्री होत असल्याचे आरोप असून, संबंधित व्यक्ती व त्याच्या नातेवाईकांकडून रोज मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. या विक्रीतील पैसा नेमका कुठे जातो आणि कोणाच्या आश्रयाने हा व्यवसाय सुरू आहे, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

यवत व परिसरातील अनेक पानटपऱ्या, चहाचे स्टॉल आणि काही किराणा दुकानांमध्ये गुटखा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एसटी स्टँड परिसरातील लाल झालेली जमीन, ठिकठिकाणी पडलेली गुटख्याची पाकिटे आणि रस्त्यावर दिसणारा कचरा हे या समस्येचे दृश्य पुरावे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
गुटखा आरोग्यासाठी अत्यंत घातक असून तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. पॅकेटवर धोक्याची स्पष्ट सूचना असतानाही त्याची खुलेआम विक्री होत असेल, तर संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

यवत परिसरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे हा व्यवसाय नेमका कोणाच्या आश्रयाने सुरू आहे? संबंधित व्यक्तीची कोणाशी जवळीक आहे? या व्यवसायाची सुरुवात कोणी केली? यवत परिसरातील गुटखा विक्रीचे जुने जाळे कोणाच्या माध्यमातून चालत होते आणि ते पुढे कोणाच्या हातात गेले? या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
गुटखा विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या घोषणा एकीकडे आणि प्रत्यक्षात गावागावात सहज उपलब्ध होणारा गुटखा दुसरीकडे, अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गुटखा, भेसळयुक्त पदार्थ आणि अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईची गरज असताना यवत आणि पाटस परिसरातील कथित गुटखा विक्रीच्या अड्ड्यांवर संबंधित विभागाची धाड कधी पडणार? हा आता नागरिकांचा थेट सवाल आहे.
या संपूर्ण प्रकरणाची महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित सक्षम यंत्रणांनी संयुक्त आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
गुटखा विक्रीचे जाळे खरेच इतके मजबूत आहे का की प्रशासनालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते? यामागे कोणाचा हात आहे, याचा छडा चौकशीतून लागणार का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनानेच जनतेसमोर देण्याची वेळ आली आहे.