आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
यवत परिसरात सकाळच्या प्रहरी गावागावात गुटख्याची फेरी सुरू असल्याची चर्चा असून, पानटपऱ्या आणि किरकोळ विक्रीच्या दुकानांपर्यंत गुटखा पोहोचविण्याचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्यात गुटख्यावर बंदी असतानाही हा व्यवसाय एवढ्या खुलेआम पद्धतीने सुरू कसा आहे, आणि यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे, हा सवाल आता उपस्थित होत आहे.
यवत परिसरात ‘अजित’ आणि ‘सत्तार’ अशी नावे या कथित गुटखा पुरवठा व्यवस्थेशी जोडली जात असल्याची चर्चा आहे. मात्र संबंधित व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांचा या व्यवसायाशी प्रत्यक्ष संबंध आहे का, याबाबत अधिकृतपणे स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिस व संबंधित प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे.
या व्यवसायात ‘हात ओले’ करण्याची पद्धत सुरू असल्याची दबक्या आवाजात चर्चा नागरिकांमध्ये आहे. महिन्याचा आर्थिक व्यवहार गोळा करून तो पुढे पोहोचविणाऱ्या व्यक्तीबाबतही परिसरात ‘ओलेकर’ अशी उपरोधिक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, पोलिस यंत्रणेशी संबंधित काही व्यक्तींना आर्थिक लाभ पोहोचत असल्याची चर्चा असल्याने या आरोपांची सत्यता तपासणे अधिक महत्त्वाचे ठरते. जर गुटखा विक्रीला खरोखरच संरक्षण दिले जात असेल, तर त्या संरक्षणामागे कोण आहे? पैसा नेमका कुठे जातो? महिन्याचा हिशेब कोण घेतो? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत.
यवत, कासुर्डी, खामगाव, नांदूर, तांब्याचीवाडी, सहजपूर, बोरीभडक, बोरीअंदी आदी परिसरात गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. यवत आणि पाटस ही कथित पुरवठ्याची प्रमुख केंद्रे असल्याचा आरोपही स्थानिक पातळीवर केला जात आहे.
गुटखा विक्रीवर शासनाची बंदी असतानाही गावागावातील पानटपऱ्यांवर तो सहज उपलब्ध होत असेल, तर बंदीच्या आदेशांची अंमलबजावणी नेमकी कुठे होते आहे? हा प्रश्न प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
या कथित व्यवसायामागील काही व्यक्तींचे पोलिसांशी संबंध असल्याची चर्चा असल्याने त्यांच्याविरोधात माहिती देण्यास नागरिक घाबरत असल्याचे बोलले जाते. “उगाच खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल,” या भीतीमुळे अनेकजण नाव सांगण्यास तयार नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.
जर हे आरोप खोटे असतील तर संबंधितांनी ते स्पष्टपणे फेटाळून लावावेत; आणि आरोपांमध्ये तथ्य असेल तर पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. गुटखा बंदी कागदावर आहे की प्रत्यक्षात? याचे उत्तर यवत-पाटस परिसरातील नागरिकांना हवे आहे.
गुटखा विक्रीचा हा कथित व्यवसाय केवळ काही पानटपऱ्यांपुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे वितरण जाळे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कारवाईपेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक नेमून गुटख्याचा स्रोत, पुरवठादार, विक्रेते आणि कथित आर्थिक व्यवहार यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रोखण्याऐवजी जर कोणाच्या आर्थिक हितासाठी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असेल, तर ही बाब केवळ कायद्याचा प्रश्न नसून संपूर्ण प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.
आता प्रश्न एकच — यवत-पाटसच्या गुटखा साम्राज्याचा खरा सूत्रधार कोण? आणि ‘हात ओले’ करण्याच्या चर्चेमागचे सत्य कधी बाहेर येणार?



