कोणी मदत देता का मदत?” – भीमा कारखान्याच्या निवडणुकीसाठी निधी नसल्याची चर्चा; ‘कोणी घर देता का घर’ची आठवण करून देणारा प्रकार?

आवाज लोकशाहीचा
निवडणुकी निधी साठी झोळी करून पैसे जमवणारे विरोधक
विजय चव्हाण……….



दौंड : “कोणी घर देता का घर” या अजरामर संवादाप्रमाणे आता दौंड तालुक्यात “कोणी मदत देता का मदत?” अशी हाक ऐकू येत असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेचा संबंध भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी निधी उभारण्याशी जोडला जात असून, त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

विरोधकांकडून असा आरोप केला जात आहे की, पारदर्शक कारभाराचे आश्वासन देत कारखान्याच्या सत्तेवर आलेल्या चेअरमन राहुल कुल आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळात कारखान्याची आर्थिक स्थिती इतकी बिघडली की, आज निवडणूक घेण्यासाठीही निधी उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदतीचे आवाहन केल्याच्या चर्चेने तालुक्यात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

विरोधकांचे म्हणणे आहे की, मदतीची झोळी दिसत असली तरी ती प्रत्यक्षात संस्थेच्या आर्थिक अवस्थेचे प्रतीक आहे. अनेक वर्षे कारभार सांभाळूनही निवडणुकीसाठी आवश्यक निधी राखून ठेवता आला नाही, हा पारदर्शक कारभाराचा पराभव असल्याची टीका केली जात आहे.

याच संदर्भात, मुंबई उच्च न्यायालयात कारखान्याच्या निवडणुकीसाठी निधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा मांडला गेल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. तसेच कारखाना चालवणारी संबंधित बँक, कारखान्याचे संचालन करणाऱ्या संस्था आणि संबंधित पक्षांनीही न्यायालयासमोर विविध भूमिका मांडल्याचा दावा करण्यात येत आहे.

दौंड तालुक्यातील ऐतिहासिक आणि महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची आजची अवस्था पाहता, “तालुक्याचा अभिमान असलेली संस्था आर्थिकदृष्ट्या एवढी अडचणीत कशी आली?” असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

कामगारांचे थकीत वेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, निवडणुकीसाठी निधीचा अभाव आणि कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. विकासकामांसाठी आलेला निधी, झालेली बांधकामे, रस्ते, आरोग्यविषयक उपक्रम आणि इतर खर्च याबाबतही पारदर्शक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

या निवडणूक निधीसाठी विरोधकांनी झोळी घेऊन मदतीचे आव्हान केले असले तरी काही नागरिक याला भीक मागावी लागत आहे मग कारखाना चालवणारे कसे असतील अशी टीका करीत कोणी घर देता का घर या अजरामर संवादाचा विषय आठवून करून देत आहेत

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत चेअरमन राहुल कुल, संचालक मंडळ तसेच संबंधित संस्थांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ती समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

मदतीची झोळी की निवडणुकीसाठी भीक