भक्कम पूल पाडून नव्या कामाचा घाट; विकास की पैशांचा खेळ?नागरिकांचा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाम विभाग सावळा गोंधळ?


आवाज लोकशाहीचा | विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील थोरात मळा–चौफुला (पुणे–सोलापूर महामार्ग) जोडणाऱ्या मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असलेला जुना पूल भक्कम व सुस्थितीत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. असे असताना तो पाडून त्याच ठिकाणी नव्याने सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याने परिसरात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जुन्या पुलामुळे कोणतीही गंभीर अडचण नव्हती. मग तो पाडण्याची गरज नेमकी काय होती? नव्या पुलासाठी एवढा मोठा खर्च करण्यामागील तांत्रिक कारणे कोणती? याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
या कामामुळे गेल्या चार महिन्यांपासून संबंधित रस्ता बंद असल्याने थोरात मळा, बोरी पारधी, टेंगले वस्ती, मगर मळा आदी भागातील नागरिकांना वरवंडकडे जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ही गैरसोय अधिक तीव्र होत असल्याचे नागरिक सांगतात.
स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा सुरू आहे की, विकासकामांच्या नावाखाली अनावश्यक बांधकामे करून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत आहे का? अशा शंका निर्माण होण्यास प्रशासनानेच वाव दिला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित पुलाच्या तांत्रिक अहवालासह जुना पूल पाडण्यामागील कारणे, मंजूर निधी, अंदाजपत्रक आणि नव्या पुलाची आवश्यकता याबाबत माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सार्वजनिक पैशातून होणाऱ्या प्रत्येक विकासकामात पारदर्शकता अपेक्षित असून, संबंधित विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट केल्यास नागरिकांच्या शंकांचे निरसन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवीन पुलाचा बांधकाम खात्याचा उद्योग.