आवाज लोकशाहीचा
विशेष वृत्त : विजय चव्हाण
दौंड तालुक्यात अवैध व्यवसायांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, विशेषतः पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या काही लॉजिंग व हॉटेलमध्ये कथित देहव्यापार, तसेच कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील तस्करी सारख्या अवैध प्रकारां बाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अलीकडेच गिरीम फाट्या वरील एका हॉटेलवर पुणे येथील विशेष पोलीस पथकाने छापा टाकून कथित देहव्यापार प्रकरणी काही महिला व ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी दौंड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देत अशा प्रकारांवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी केली.
या घटनेनंतर नागरिकांकडून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे—कारवाईसाठी पुण्याहून विशेष पथक यावे लागते, मग स्थानिक पोलीस यंत्रणा नेमकी काय करत होती? अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतही यापूर्वी एका हॉटेलवर दोन वेळा कथित देह व्यापारा विरोधात छापे पडल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे अशा कारवायां नंतर संबंधित ठिकाणी कठोर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, अवैध धंद्यांना विरोध करणाऱ्यांनाच विविध प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणीही होत आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत, दौंड शहर, पुणे–सोलापूर महामार्ग परिसर तसेच भांडगाव, नांदूर, सहजपूर आदी औद्योगिक भागांमध्ये अवैध व्यवसायांचे जाळे असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्यामुळे या सर्व प्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणातील सर्व आरोप व नागरिकांनी व्यक्त केलेल्या शंका यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित पोलीस विभागानेही आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे.



