दूध भेसळीच्या चर्चेत इंदापूरातील सोनई उद्योग; व्यवस्थापनाने मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणानंतर राज्यातील दुग्ध व्यवसायाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील सोनई उद्योगाचे नाव विविध चर्चांमध्ये घेतले जात असल्याने या प्रकरणाची वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक बनले आहे.
सध्या समाजमाध्यमे, बाजारपेठा आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चा आणि दावे होत असले तरी कोणत्याही संस्थेला अधिकृत तपास किंवा सक्षम यंत्रणेच्या अहवालाशिवाय दोषी ठरविणे योग्य ठरत नाही. मात्र वाढत्या चर्चांमुळे संबंधित उद्योग व्यवस्थापनाने पुढे येऊन आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणे ही काळाची गरज ठरत आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री केल्याचे सिद्ध झाल्यास दंडापासून कारावासापर्यंत कठोर कारवाई होऊ शकते.
देशभरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने विशेष मोहीम सुरू केली असून राज्यांनाही कठोर तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर इंदापूरातील सोनाई डेअरी व्यवस्थापनाने जनतेसमोर येऊन आपली बाजू स्पष्ट करणे, पुरवठा साखळी, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि प्रयोगशाळा तपासणीबाबत माहिती जाहीर करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. उद्योगावरील विश्वास टिकवायचा असेल तर पारदर्शकता हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
तपास यंत्रणांचे अहवाल, अधिकृत नमुना चाचण्या आणि सरकारी निष्कर्ष समोर आल्यानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत अफवा, अंदाज आणि चर्चांपेक्षा अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणे हेच सर्वांसाठी हिताचे ठरणार आहे.