आवाज लोकशाहीचा शिक्रापूर | प्रतिनिधी
सुमारे ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात तब्बल पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सतत ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी तीन दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून जेरबंद करण्यात आला.
पोलिसांनी ८ जुलै २०२१ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून सुमारे ७८ लाख रुपयांचा बेकायदेशीर गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईनंतर ९ जुलै २०२१ रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हा फरार झाला होता. तपासात तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अनेकवेळा त्याचा शोध घेतला; मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
फरार आरोपींच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली. आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तीन दिवस सातत्याने पाठलाग करून तांत्रिक माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या मदतीने सापळा रचला आणि गवते वस्ती, चाकण येथून त्याला ताब्यात घेतले.
या अटकेमुळे गुटखा तस्करीविरोधातील पोलिसांच्या कारवाईला मोठे बळ मिळाले असून, आरोपीकडून आता या रॅकेटमधील आर्थिक व्यवहार, इतर साथीदार आणि संपूर्ण नेटवर्कबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह के., अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे तसेच पोलीस अंमलदार गणेश येळवंडे, नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
“गुन्हा कितीही जुना असला, तरी कायद्याचा हात लांब असतो,” याची पुन्हा एकदा या कारवाईतून प्रचिती आली आहे.


