आवाज लोकशाहीचा
दौंड, ता. — प्रतिनिधी (विजय चव्हाण)
दौंड तालुक्यातील राजेंगाव परिसरात भीमा नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मातीची बेकायदेशीर तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हजारो ब्रास माती नदीपात्रातून उपसून ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने वाहून नेली जात असतानाही संबंधित महसूल विभागाने या प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कारवाईसाठी येणारे अधिकारी केवळ औपचारिक पाहणी करून परत जातात. “मंडळ अधिकारी येतात आणि काही वेळात निघून जातात, मात्र कोणतीही ठोस कारवाई होत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर माती उपसा होत असतानाही प्रशासनाकडून एकदाही पंचनामा करण्यात आलेला नाही.
दरम्यान, या बेकायदेशीर कामात गुंतलेले तस्कर पूर्णपणे बेधडक झाले असून, रात्री-अपरात्री नदीपात्रातून माती काढून ती मोठ्या वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे. या तस्करांकडे घातक हत्यारे असल्याचीही चर्चा असून, विरोध करणाऱ्यांना धमकावले जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचीही चर्चा रंगली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची या अवैध व्यवसायात ‘भागीदारी’ असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळेच प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप होत आहे.
नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर माती उपसल्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असून, शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूलही बुडत आहे. या पार्श्वभूमीवर, “सामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई करणारे प्रशासन एवढ्या मोठ्या गैरप्रकाराकडे का दुर्लक्ष करते?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.



