केडगाव चौफुला रोडवर भीषण आग; दोन दुकानांचे सुमारे ५० लाखांचे नुकसान

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला रोड परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आणि दुचाकी दुरुस्ती गॅरेज पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे ५० लाख रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
१३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली. आग लागण्याचे कारण संशयास्पद असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, अज्ञात व्यक्तींनी दुकानाच्या मागील पत्र्याचा भाग कापून आत प्रवेश करत आग लावली असावी,

कापलेला पत्रा दिसणारे शंकास्पद दृश्य

असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळ केडगाव चौफुला रोडवरील के के बेकरीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमधील गाळ्यांमध्ये आहे. या ठिकाणी नांनगाव येथील तुषार कोंडे यांनी “मोरया इलेक्ट्रिकल्स” नावाने इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान सुरू केले होते. दुकानात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक साहित्य साठवलेले होते. शेजारीच केडगाव येथील किशोर मधुकर गायकवाड यांचे “लक्ष्मी ऑटो गॅरेज” नावाचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान होते, ज्यामध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या काही दुचाकी देखील होत्या.
आग लागल्यानंतर संपूर्ण साहित्य, दुचाकी आणि दुकानातील सर्व वस्तू जळून राख झाल्या. या घटनेत
मोरया इलेक्ट्रिकल्सचे सुमारे ४० लाख  अधिक रुपयांचे नुकसान,
तर लक्ष्मी ऑटो गॅरेजचे सुमारे ४ ते ५ लाख अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे दुकानदारांना कोणतेही साहित्य वाचवता आले नाही. उपलब्ध फोटो नुसार दुकानाच्या मागील बाजूस पत्रा कापल्याचे स्पष्ट दिसत असल्याने हा प्रकार घातपाताचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणी केडगाव पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
या आगीमुळे दोन्ही व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

जळालेली दोन्ही दुकानांची अवस्था