पुण्याची कचरा कुंडी दौंड?,…कचरा माफिया, ठेकेदार आणि ‘राजकीय’ वरदहस्त?.कचरा टाकणारे जोमात ,नागरिक कोमात..

विजय चव्हाण (आवाज लोकशाहीचा)

पुणे महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट ज्या ठेकेदारांना दिले आहे, ते ठेकेदार कचरा दौंडमध्ये टाकत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे काम करण्यासाठी स्थानिक ‘कचरा दलाल’ सक्रिय झाले आहेत. या दलालांना स्थानिक राजकीय नेत्यांचे अभय असल्याने पोलीस आणि महसूल प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
“प्रशासनाकडून होणारी कारवाई हा केवळ एक ‘दिखावा’ आहे. प्रत्यक्षात राजकीय दबावामुळे अधिकारी या कचरा माफियांच्या वाटेला जात नाहीत,” असा संतप्त आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

कचऱ्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत आणि दुर्दैवी बाब म्हणजे, त्याच आजारी लोकांना मदत करण्याचे नाटक करून लोकप्रतिनिधी आपले राजकीय उखळ पांढरे करत आहेत.
आजारी पडलेल्यांना मदत केल्याचा सोशल मीडियावर मोठा प्रचार केला जातो.
परंतु, नागरिकांना आजारी पाडणारा तो कचरा आणि घाण पाणी बंद करण्यासाठी मात्र कोणीही ठोस पाऊल उचलत नाही.

दौंड तालुक्याला पुण्याचा कचरा डेपो बनवण्याचे हे षडयंत्र कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? गावकरी आपला हक्क मागत असताना त्यांचा आवाज का दाबला जातोय? या कचरा साखळीचा खरा सूत्रधार कोण आहे?
प्रशासनाला इशारा:
जर येत्या काही दिवसांत बेबी कॅनॉलची स्वच्छता झाली नाही आणि पुण्याचा कचरा दौंडमध्ये टाकणे बंद झाले नाही, तर गावकऱ्यांचा संयम सुटेल. मग होणाऱ्या उद्रेकाला केवळ आणि केवळ प्रशासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधीच जबाबदार असतील.
दौंडकरांचा एकच सवाल: आम्हाला शुद्ध हवा आणि पाणी मिळणार की आम्ही केवळ पुण्याच्या कचऱ्याचे धनी व्हायचे?