आवाज लोकशाहीचा | रणजीत पाटील (मांडवगण फराटा)
अष्टविनायक यात्रेतील महत्त्वाचे स्थान असलेल्या सिद्धटेक गणपती मंदिर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी जीवघेणा धोका निर्माण झाला आहे. दौंड तालुक्यातून कर्जत तालुक्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलाचा काही भाग अक्षरशः खचला असून पुलातील लोखंडी सळ्या उघड्या पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
स्थानिक वाहनचालक आणि प्रवाशांच्या मते, पुलाच्या एका बाजूला जवळपास ८ इंचांपर्यंत खच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पूल भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी, होडी प्रवासाची गरज संपवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आला होता.
भीमा नदीवरील हा मार्ग अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक आणि रांजणगाव या प्रमुख गणपतींना जोडणारा दौंड तालुक्यातील महत्त्वाचा दुवा आहे.
मात्र, साधारण दहा ते पंधरा वर्षांच्या आतच पुलाची अवस्था दयनीय झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याच परिसरात १०० वर्षांपूर्वी बांधलेला रेल्वे पूल आजही सक्षम आहे.
पण त्याच्या शेजारी उभारल्या जाणाऱ्या नव्या पुलाचे खांब वाकण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. परिणामी ते तोडून पुन्हा काम करावे लागले.
हा विरोधाभास नेमका काय दाखवतो?दर्जाहीन बांधकाम?
की थेट भ्रष्टाचार?
उजनी धरणच्या पाण्याचा फुगारा या परिसरात मोठ्या प्रमाणात साठतो. आलेगाव, वडगाव दरेकर पट्ट्यात नदीपात्र कायम पाण्याखाली असते.
अशा परिस्थितीत पुलाचे डिझाईन आणि बांधकाम अधिक मजबूत असणे अपेक्षित होते. पण वास्तव याच्या उलट दिसत आहे.
दररोज शेकडो भाविक या मार्गाने सिद्धटेक गणपती मंदिर येथे दर्शनासाठी येतात.
सध्या पुलावरील परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी अवस्था सद्यस्थितीत पाहिल्यावरती दिसून येत आहे,
पुलाची तात्काळ तपासणी करणे काळाची गरज आहे अन्यथा दुर्लक्षित झाल्यास भविष्यकाळात या ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकतो तसेच याची स्थळ पाणी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणची वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहणारे लोक करू लागले आहेत
सिद्धटेकचा हा पूल आता विकासाचे प्रतीक नसून धोक्याची घंटा ठरत आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर अष्टविनायक यात्रेवर निघालेल्या भाविकांसाठी हा पूल “श्रद्धेचा मार्ग” नसून “मृत्यूचा मार्ग” ठरू शकतो.



