उजनी नदीपात्रात माती चोरांचा हैदोस; वृत्त प्रसिद्ध होताच माफियांचे ‘धाबे दणानले’

आवाज लोकशाहीचा
दौंड, प्रतिनिधी :
दौंड तालुक्यातील राजेंगाव येथील उजनी नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर माती उपसा सुरू असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या अवैध उत्खननाबाबत वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित माती माफियांचे ‘धाबे दणानले’ असून, कारवाईच्या भीतीने त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या माती चोरांच्या टोळ्यांकडे घातक हत्यारे असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थ व नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणीही उघडपणे याविरोधात आवाज उठवण्यास धजावत नाही. या दहशतीचा फायदा घेत संबंधित माफिया नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर मातीची लूट करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रात्री व पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मातीचे उत्खनन सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर माफियांनी स्वतःची गस्त वाढवली असून, कारवाई टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात असल्याचे दिसते. मात्र, या प्रकारामुळे नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, भविष्यात नदीची धूप होण्याची तसेच पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उजनी नदीपात्र हे या भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच हत्यारे बाळगणाऱ्या व सरकारी संपत्तीची चोरी करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशीही मागणी जोर धरत आहे.