आवाज लोकशाहीचा
शिरूर (दि.१०):
शिरूर तालुक्यातील वरूडे गावात मध्यरात्री घडलेल्या निर्घृण खुनाने संपूर्ण परिसर हादरला आहे. घराबाहेरील ओट्यावर शांत झोपलेल्या इसमाचा धारदार कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वरूडे येथील रानमळा परिसरातील बाळासो बबन तांबे (वय ४३) हे उकाड्यामुळे घराबाहेर ओट्यावर झोपले होते. ८ जूनच्या पहाटे अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या गळ्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळताच गावात एकच खळबळ उडाली.
जुन्या वादातून सूड — अल्पवयीनाचा थरारक कबुलीजबाब
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास सुरू केला. मयताचे पूर्वीचे वाद, गावातील संबंध आणि हालचालींचा सखोल तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
गावातीलच एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पालकांसमक्ष चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दोन वर्षांपूर्वीच्या भांडणाचा राग आणि अलीकडील शिवीगाळ-धमकीचा सूड मनात धरून, संतापाच्या भरात झोपेत असलेल्या तांबे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून खुनासाठी वापरलेला कोयता जप्त केला आहे.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी — ३६ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
या घटनेत कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक तपास, माहिती संकलन आणि बारकाईच्या चौकशीच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व त्यांच्या पथकाने केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
संदिपसिंह गिल्ल – पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
शुभम कुमार – अपर पोलीस अधीक्षक
प्रशांत ढोले – उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर
प्रमोद क्षिरसागर – पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.
वरूडे येथील ही घटना केवळ खून नाही, तर तरुण पिढीत वाढत चाललेला सूडभाव आणि हिंसक प्रवृत्तीचा धोकादायक संकेत आहे.
अल्पवयीन मुलाच्या हातून इतक्या क्रूर पद्धतीने खून होणे ही चिंतेची बाब असून, समाज आणि कुटुंब व्यवस्थेसाठी गंभीर इशारा आहे.
गावात वाढते वाद इतके टोकाला का जात आहेत?
अल्पवयीनांमध्ये वाढणारी हिंसक मानसिकता थांबवणार कोण?
प्रशासन आणि समाज यावर काय पावले उचलणार



