दौंड तालुक्यातील दापोडीतील गुऱ्हाळावर छापा की दिखावा? कारवाईनंतर काही तासांतच पुन्हा सुरू उत्पादन

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण..
पुणे जिल्ह्यातील दापोडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यानंतरही काही तासांतच गूळ उत्पादन पुन्हा सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित कारवाईबाबत नागरिकांमध्ये तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गुऱ्हाळावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर गूळ, साखर व भेसळयुक्त साहित्य जप्त केले. या कारवाईदरम्यान अधिकारी के. व्ही. बारवकर आणि त्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित होते. जप्त करण्यात आलेल्या सुमारे ५ लाख ६४ हजार २४८ रुपयांच्या मुद्देमालावर साध्या दोऱ्याने सील लावण्यात आले होते व त्यावर अधिकृत पत्रक चिकटविण्यात आले होते.
पत्रकानुसार २०७६ किलो गूळ (₹९१,३४४), १३३२ किलो गूळ (₹५८,६०८), १०,१०० किलो भेसळयुक्त गूळ (₹४,०४,०००) तसेच इतर साहित्य असा साठा जप्त करण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र, या सील केलेल्या जागेच्या अगदी काही अंतरावरच गूळ उत्पादन पुन्हा सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.
विशेष म्हणजे संबंधित गुऱ्हाळाचा चालक शहादात डी. हुसेन हा परप्रांतीय असून जागामालक स्थानिक असल्याचे समोर आले आहे. या दोघांकडे आवश्यक परवाने आहेत का, त्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे पालन केले आहे का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
याच परिसरात सुमारे ५०० मीटर अंतरात अनेक गुऱ्हाळे रात्रंदिवस साखरेपासून गूळ तयार करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच खराब साखर व निकृष्ट दर्जाचे चॉकलेट मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. खुटबाव रोडजवळील एका ठिकाणी या साहित्याचा मोठा साठा असल्याची माहिती पुढे आली आहे.


यापूर्वी देखील अन्न व औषध प्रशासनाने याच भागात एकाच दिवशी तीन गुऱ्हाळांवर कारवाई केली होती. मात्र त्या कारवाईचे पुढे काय झाले, दोषींवर कोणती कारवाई झाली, याबाबत कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
या पार्श्वभूमीवर, सद्य कारवाई ही केवळ दिखावा तर नाही ना, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. अन्यथा, अशा कारवाया केवळ कागदोपत्री राहून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

छापा नंतर चिकटविलेले पार्क
छापा टाकलेले गुऱ्हाळ