आवाज लोकशाहीचा …….
गोपाळवाडी प्रतिनिधी प्रभव काळे
दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे राष्ट्रीय जनगणना २०२७ या अत्यंत महत्वाच्या शासकीय कामाला जाणीवपूर्वक टाळाटाळ करत कर्तव्यच्युती करणाऱ्या तीन शिक्षकांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणेत कामचुकारपणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंडळ अधिकारी श्रीकृष्ण बाबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून रामदास साहेबराव बारवकर, सुवर्णा कानिफनाथ खळदकर आणि सिमा सुभाष साबळे या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३(अ) तसेच जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित आरोपींना मौजे गलांडवाडी (ब्लॉक क्रमांक २१५) येथे दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक म्हणून अधिकृत नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांनी हे राष्ट्रीय कर्तव्य जाणीवपूर्वक नाकारत कामावर गैरहजर राहण्याचा मार्ग स्वीकारला. इतकेच नव्हे, तर प्रशासनाकडून वारंवार व्हॉट्सअॅपद्वारे सूचना देऊनही त्यांनी आदेशांचे पालन केले नाही.
ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून, राष्ट्रीय स्तरावरील जनगणना प्रक्रियेला बाधा आणणारे हे कृत्य असल्याचे प्रशासनाचे मत आहे. शासनाच्या आदेशाला जुमानत नाहीत, तर मग सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भापकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार मोहिते करत आहेत.
सरकारी नोकरीत असलेलेच जर राष्ट्रीय जबाबदारी टाळत असतील, तर प्रशासनाची शिस्त नेमकी कुठे आहे? अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर केवळ गुन्हे दाखल करून भागणार आहे का, की कठोर विभागीय कारवाईही होणार?
दौंड तालुक्यातील ही घटना केवळ एक उदाहरण नसून, शासन यंत्रणेत वाढत चाललेल्या निष्काळजीपणाचा गंभीर इशारा मानला जात आहे.



