आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यातून सध्या साई प्रिया शुगर या नावाने सुरू असलेल्या कारखान्यात एक संशयास्पद प्रकार समोर आला असून, जवळपास २०टन वजनाचा मिथेल (जस्त) घेऊन जाणारा ट्रक अचानक थांबवण्यात आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, के.ए. २२ एए ०५३६ क्रमांकाचा ट्रक कारखाना परिसरात आला होता. या ट्रकमध्ये स्क्रॅप स्वरूपातील साहित्य भरलेले असल्याची माहिती समोर येत असली तरी हा माल कायदेशीर होता की चोरीचा, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. विशेष म्हणजे, साखर उपसंचालकांच्या सतर्कतेमुळे हा ट्रक थांबवण्यात आल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नसून, “माहिती घेतो”, “मला माहिती नाही” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे संशय अधिकच गडद होत आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना सध्या कर्नाटकातील निराणी ग्रुपकडे २५ वर्षांच्या करारावर चालविण्यास देण्यात आलेला आहे. मात्र, या करारातील अटी व नियमांमध्ये मोठा गोंधळ असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या अटींनुसार सर्व जुनी देणी भागवण्याची जबाबदारी ग्रुपवर होती. परंतु, स्थानिक संचालक मंडळ व चेअरमन राहुल कुल यांनी केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या देण्यांपासून ग्रुपला मुक्त केल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर कारखान्यातील आर्थिक व्यवहार, मालाची आवक-जावक प्रक्रिया आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संबंधित ट्रक नेमका कोणाच्या आदेशाने आला, त्यात नेमके काय भरले होते, आणि तो माल खाली का करण्यात आला, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
या सर्व प्रकारामुळे पाटस परिसरात नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण आहे. “आंधळा दळते आणि कुत्रं पीठ खातंय” अशी परिस्थिती कारखान्यात निर्माण झाली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, आवाज लोकशाहीने यापूर्वीही कारखान्याशी संबंधित अनेक कागदपत्रांसह बातम्या प्रकाशित केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत संचालक मंडळ किंवा संबंधितांकडून कोणतीही विरोधी भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून या बातम्यांवर विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी साई प्रिया शुगर आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण सत्य जनतेसमोर मांडावे, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, या ट्रक प्रकरणामुळे कारखान्यावरील संशय अधिकच गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बाबत सत्य काय आहे हे संचालक मंडळ अथवा साईप्रिया ग्रुपने योग्य त्या खुलासाबाबत आवाज लोकशाहीकडे कागदपत्र सपोर्ट करून आपला अभिप्राय व्यक्त केल्यास वाचक वर्गासाठी त्यांच्या प्रतिक्रिया या प्रकट केल्या जातील



