दौंड तालुका गुन्हेगारीच्या सावटाखाली? राजकीय संरक्षणामुळे अवैध धंद्यांना बळ!

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड तालुक्यात कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी आता एक धोकादायक आणि चिंताजनक ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे. अवैध मुरूम उत्खनन, माती चोरी, जुगार, ऑइल चोरी, गॅस तस्करी अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये तरुणांना जाणीवपूर्वक ढकलले जात असून, त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याची गंभीर चर्चा सुरू आहे.
या तरुणांना पोलिसांपासून वाचवण्यासाठी एक संगठित यंत्रणा कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तस्करांचे मनोबल वाढले आहे.

कुरकुंभ परिसर हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी येथे गॅस, क्रूड ऑइल आणि नशिल्या पदार्थांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात चालतो, अशी उघड चर्चा आहे. या व्यवसायांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचेही आरोप होत आहेत.
विशेष म्हणजे, कुरकुंभ पोलीस चौकीत एकाच कर्मचाऱ्याची तब्बल आठ वर्षे सेवा सुरू असून, त्याच्यावर अनेक तक्रारी होऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चौकीत मोठ्या प्रमाणात “माया” गोळा केली जाते, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

या परिसरात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. मात्र, मूळ सूत्रधारांऐवजी बाहेरून आलेल्या कामगारांना आरोपी ठरवून प्रकरणे दडपली जात असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे स्थानिक गुन्हेगारीला अभय मिळत असल्याचे चित्र आहे.

रसायन चोरी, गॅस चोरी, औद्योगिक अपघात दडपणे अशा घटनांमध्ये स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. विशेष म्हणजे, काही मोठ्या कारवाया बाहेरील विशेष पथकांनी केल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.

कुरकुंभ परिसरातील काही लॉजमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी असूनही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
राजेगाव, खानोटा, स्वामी चिंचोली, खडकी, देऊळगाव राजे, वडगाव दरेकर, बोरी, बेल, वाटलुज या भागात माती, वाळू आणि मुरूम चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच देवळगाव राजे , खोर कुसेगाव वांसुदे, हिगणीगाडा भागात सर्व तस्कर नेत्याचे कार्यकर्ते असल्याची लोक चर्चा असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

राजकीय फायद्यासाठी तरुणांना गुन्हेगारीकडे ढकलले जात आहे का? प्रशासन आणि राजकीय नेते यावर उत्तर देणार का?
दौंड तालुक्यात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात तीव्रतेने निर्माण झाला आहे.