दौंड तालुक्याच्या राजकारणाला ममत्वाची, समतेची आणि सुसंस्कारांची दिशा देणाऱ्या पहिल्या महिला आमदार “उषादेवी (माँ) जगदाळे यांचे निधन,….

आवाज लोकशाहीचा
विजय चव्हाण…
दौंड तालुक्याच्या राजकारणाला ममत्वाची, समतेची आणि सुसंस्कारांची दिशा देणाऱ्या पहिल्या महिला आमदार “माँ” उषादेवी कृष्णराव जगदाळे (पाटील) यांचे वृद्धापकाळातील आजाराने दुःखद निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने केवळ जगदाळे परिवारावरच नव्हे, तर संपूर्ण दौंड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
उषादेवी जगदाळे या नावातच एक मातृत्वाची ऊब होती. १९७१-७२ मध्ये नगराध्यक्ष पद भूषवून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि १९७२ ते १९७७ या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आमदार म्हणून काम करत त्यांनी लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. पुढे १९८५ ते १९९० या कालखंडात इंडियन काँग्रेस (सोशालिस्ट) मधून पुन्हा आमदार होत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली.
त्यांच्या सोबतच त्यांचे पती दिवंगत कृष्णराव बाजीराव जगदाळे पाटील यांनीही १९८० ते १९८५ या काळात आमदार म्हणून दौंड तालुक्याची धुरा सांभाळली. या दांपत्याने राजकारणाला सत्तेचा नव्हे, तर सेवाभावाचा चेहरा दिला. त्यांच्या कारकिर्दीत कधीही सामान्य नागरिकांना अन्यायाचा सामना करावा लागला नाही—हीच त्यांची खरी ओळख ठरली.
जगदाळे परिवार हा दौंडमध्ये “पाटील परिवार” म्हणून ओळखला जातो. या परिवाराने राजकारणात कधीही जातीपातीचा आधार घेतला नाही, तर समता, बंधुता आणि आपुलकीचा मार्ग स्वीकारला. उषादेवी यांच्या पश्चात त्यांचा वारसा पुढे नेणारे त्यांचे सुपुत्र वीरधवल जगदाळे (पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष) आणि इंद्रजीत जगदाळे (माजी नगराध्यक्ष व नगरसेवक) हे सक्रिय आहेत. तसेच त्यांची नात दुर्गादेवी जगदाळे या विद्यमान नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
“माँ” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उषादेवी यांनी राजकारणात केवळ पदे मिळवली नाहीत, तर माणसं जोडली. त्यांचे प्रेम, जिव्हाळा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यामुळे त्या प्रत्येक दौंडकराच्या मनात घर करून राहिल्या.
आज त्या नाहीत, पण त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि त्यांनी दाखवलेला लोकसेवेचा मार्ग कायम जिवंत राहील. त्यांच्या जाण्याने जगदाळे परिवाराचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे मातृत्व हरपले आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली!