दौंडमध्ये कोटीं रक्कमेचा ‘मृत्युलेख’ लिहून विवेक गटने, मुद्रांक विक्रेत्याची आत्महत्या


दौंड (प्रतिनिधी):विजय चव्हाण
सत्ता, संपत्ती आणि राजकीय दहशतीच्या जोरावर एका ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा संतापजनक प्रकार दौंड शहरात घडला आहे. मुद्रांक विक्री व्यवसायातील सुप्रसिद्ध नाव, विवेक शंकर गटने ७०, यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र, मरण्यापूर्वी त्यांनी लिहिलेला  कोटी रुपयांचा हिशोब आणि छळाचा सविस्तर तपशील हा केवळ सुसाईड नोट नसून, शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारी व्यवस्थेचा जिवंत पुरावा ठरला आहे.

गटने यांनी १ जानेवारीपासून सलग १० दिवस स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगांची नोंद केली आहे. या नोंदींनुसार, त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करणे, कुऱ्हाडीचा धाक दाखवणे आणि त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, भांडी तसेच कोरे धनादेश बळजबरीने हिसकावून घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या एका जमीन विक्रीच्या व्यवहारातून मिळालेल्या पैशांवर काही ‘पांढरपेशी’ दरोडेखोरांची नजर होती, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे गटने यांनी आपल्या लेखनात काही राजकीय व्यक्तींचा आणि आश्रयाचा थेट उल्लेख केला आहे. “आमदार साहेब आणि प्रेमसुख कटारिया, तुम्ही माझ्या मारेकऱ्यांना पाठीशी घालू नका”, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. राजकीय छत्राखाली वावरणारी ही मंडळी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे हे विदारक चित्र आहे. व्याजाचा फास आणि बँकिंग व्यवहारातील फसवणुकीने त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते.

गटने यांनी लिहिलेल्या मृत्युपूर्व नोंदी (Dying Declaration / Notes) हा कायदेशीरदृष्ट्या अत्यंत सबळ पुरावा मानला जातो. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार:
कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे): जर या नोंदींमध्ये नावांचा स्पष्ट उल्लेख असेल, तर संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे.


एक ज्येष्ठ नागरिक सलग १० दिवस आपल्यावरील अत्याचाराची नोंद करत असताना, पोलीस यंत्रणेला याची कुणकुण कशी लागली नाही? गटने आणि त्यांची आजारी पत्नी शहरात एकटे राहत असताना त्यांच्यावर इतका दबाव टाकला गेला की त्यांना मृत्यू जवळ करावा लागला. या घटनेमुळे शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून, एका प्रामाणिक व्यावसायिकाचा व्यवस्थेने केलेला बळी आहे. जर पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेप झाला किंवा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला, तर दौंडमधील जनक्षोभ शांत करणे कठीण जाईल.
आता प्रतिक्षा आहे ती पोलिसांच्या अधिकृत भूमिकेची आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची!