पुजाऱ्यांच्या वारसांमध्ये ३६ एकर जमिनीवरून ठिणगी; भाडेतत्त्वावरील उत्पन्नाचा मोह की हक्काची लढाई? ‘बहिणीला वाटा नाकारल्याने’ संताप.
बोरीपारधी (प्रतिनिधी):विजय चव्हाण
श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक असलेल्या बोरीपारधी येथील ग्रामदैवत श्री बोरामलनाथ मंदिराच्या जमिनीचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. देवाच्या सेवेसाठी मिळालेल्या ३६ एकर इनाम जमिनीच्या वाटपावरून पुजाऱ्यांच्या दोन कुटुंबांत ‘कुरुक्षेत्र’ ओढवले असून, हा वाद आता थेट न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, भावा-भावांत जमिनीचे वाटे होत असताना बहिणीला मात्र हक्कापासून वंचित ठेवल्याने परिसरातून मोठी टीका होत आहे.
नेमके प्रकरण काय?
बोरामलनाथ देवस्थानच्या पूजा-अर्चा आणि सेवेसाठी पुरातन काळापासून गुरव (शेलार) कुटुंबाला केडगाव-चौफुला मुख्य रस्त्यालगत ३६ एकर जमीन देण्यात आली आहे. मूळ सातबारा उताऱ्यावर एकनाथ भिमाजी शेलार यांचे नाव होते. कालांतराने त्यांचे बंधू जगन्नाथ शेलार सेवानिवृत्त होऊन आल्यावर फेरफार क्रमांक ७५२ नुसार त्यांचे नाव दाखल झाले. मात्र, हे वाटप कायदेशीर प्रक्रियेतून झाले की केवळ तोंडी संमतीने, याबाबत अद्याप संभ्रम आहे.
१९९० मध्ये महसूल अधिनियमाच्या दुरुस्तीनुसार फेरफार क्रमांक २१७२ आदेशाने कब्जेदार छत्री असलेल्या या दोन्ही नावांना इतर हक्कात नोंदण्यात आलेले आहे.
सध्या ही जमीन शेतीसाठी वापरण्याऐवजी तिचा व्यावसायिक वापर सुरू झाला असून, त्यातून महिन्याकाठी लाखो रुपयांचे भाडे वसूल केले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मूळ उद्देश ‘उदरनिर्वाह’ असताना ‘व्यावसायिक नफा’ हा वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे.
मामा विरुद्ध भाचा: संघर्षाची ठिणगी
एकनाथ शेलार यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांमध्ये वाद उफाळून आला आहे. एकनाथ शेलार यांनी हयातीतच आपली मुलगी आणि जावई यांच्यासाठी (चौधरी परिवार) व्यवसायाकरिता जागा दिली होती. मात्र, आता जगन्नाथ शेलार यांचा मुलगा विकास याने ही जागा खाली करून घेण्यावरून चौधरी परिवाराशी वाद सुरू केला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, हे प्रकरण आता कायदेशीर पेचात अडकले आहे.
प्रकरणाने अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे:
देवस्थान जमिनीचे स्वरूप: ही जमीन जर ‘इनाम’ किंवा ‘वतन’ वर्गातील असेल, तर तिचा मूळ उद्देश केवळ देवाची सेवा करणाऱ्याचा उदरनिर्वाह हा असतो. अशी जमीन आपापसात वाटून घेता येते का? व्यावसायिक वापर: देवस्थानच्या जमिनीवर व्यावसायिक गाळे उभारून त्याचे भाडे वैयक्तिकरीत्या लाटणे कायद्याने वैध आहे का? की हा धर्मादाय आयुक्तांच्या (Charity Commissioner) नियमांचा भंग आहे?
वारसा हक्क (हिंदू वारसा कायदा): संविधानाने आणि सर्वोच्च न्यायालयाने मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क दिला असताना, केवळ भावांमध्ये वाटणी करून बहिणींना डावलणे हा कायद्याचा अपमान नाही का?
‘देवाचा न्याय आता संविधानाकडे? भक्तांचा मात्र देवाकडे
खामगळ,वाडी, कोलवडी, हातवळण आणि बोरीपारधी या चार गावांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराच्या पुजाऱ्यांमधील हा गृहकलह पाहून भाविकांमध्ये नाराजी आहे. “जमीन देवाची आणि भांडण भावांची” या वृत्तीमुळे देवस्थानच्या पावित्र्याला धक्का लागत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.संकटात भाविक देवाकडे साकडे घालतात त्याच देवाचा जमीन प्रश्न संविधानाकडे गेला आहे .
देवस्थानची जमीन ही कोणा एकाची खासगी मालमत्ता नसते. जर या जमिनीची ‘ट्रस्ट’ (विश्वस्त संस्था) नोंदणी झालेली असेल, तर अशा जमिनीचे बेकायदेशीर वाटप किंवा व्यावसायिक वापर हा फौजदारी गुन्ह्याचा विषय ठरू शकतो. आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते आणि धर्मादाय आयुक्त याकडे कशा प्रकारे पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




