आवाज.लोकशाहीचा…, विजय चव्हाण
दौंड (पुणे):
ज्या योजनेतून घराघरात ‘गंगा’ पोहोचण्याचे स्वप्न दाखवले गेले, त्याच योजनेच्या नळजोडणीवरून आज दौंड तालुक्यातील राजेगाव रक्ताने माखले आहे. विजेंद्र भोसले यांची झालेली निर्घृण हत्या ही केवळ दोन व्यक्तींमधील वाद नसून, ती दौंडमधील १२७कोटींच्या जलजीवन योजनेतील माजलेल्या भ्रष्टाचाराचा आणि प्रशासकीय नाकर्तेपणाचा थेट परिणाम आहे.
प्रशासकीय ‘तमाशा’: एकाचा जीव गेला, तरी अधिकारी अजूनही अंधारात!
राजेगावच्या या हत्याकांडाने प्रशासनातील समन्वय किती ‘सडलेला’ आहे हे जगासमोर आणले आहे. एकीकडे नूतन ग्रामसेवक सांगतात, “योजना अपूर्ण आहे, नळजोडणीचा प्रश्नच येत नाही,” तर दुसरीकडे शाखा अभियंता छातीठोकपणे सांगतात की, “काम सुरू होते.” आमचा सवाल आहे: जर योजना अपूर्ण आहे, तर नळजोडणीसाठी गावात गेलेली ती लोकं कोण होती? कोणाच्या आशीर्वादाने हा नळजोडणीचा खेळ सुरू होता? अधिकाऱ्यांच्या या परस्परविरोधी विधानांनी सिद्ध केले आहे की, दौंडचा पाणीपुरवठा विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात आणि ‘चहापाणी’ घेण्यात मग्न आहे.
सुमारे १२७ कोटी गेले कुठे? जनतेच्या घामाचा पैसा भ्रष्टाचाराच्या गटारात!
२०१७-१८ पासून सुरू असलेल्या या योजनेचा उजेड अजूनही तालुक्याला पडलेला नाही. अनेक गावांत पाईप टाकून ठेवलेत पण ते कोरडेठाक आहेत. ठेकेदारांनी आपली खिसे भरले, अधिकाऱ्यांनी डोळे मिटून घेतले आणि आता त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे जीव जाऊ लागले आहेत. ही हत्या नाही, तर ही प्रशासनाने केलेली व्यवस्थेची हत्या आहे!
सत्ताधारी आणि विरोधक गप्प का?
दौंड तालुक्यात सुमारे१२७ कोटींचा चुराडा झाला, कामे अर्धवट राहिली, आणि आता खून झाला, तरीही राजकीय नेते अजूनही मूग गिळून गप्प का आहेत? ठेकेदारांवर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची हिंमत शासन दाखवणार का?
आवाज लोकशाहीचा सवाल:
“पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या या योजनेने आज एका घराचा दिवा विझवला आहे. या हत्येचे पाप कोणाच्या कपाळावर? केवळ गुन्हेगाराला जेलमध्ये टाकून चालणार नाही, तर या योजनेत ‘हात ओले’ करणाऱ्या प्रत्येक पांढरपेशा भ्रष्टाचाऱ्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत.”
नागरिकांची मागणी:
पोलीस तपासात केवळ खुनाचा अँगल न तपासता, या वादाला खतपाणी घालणाऱ्या जलजीवन योजनेच्या कामाचे ऑडिट व्हावे आणि संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जनतेचा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
आवाज लोकशाहीचा – सडेतोड, निर्भीड, कायम जनतेच्या पाठीशी!



